पुणे नाशिक हा सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प सद्या प्रलंबित आहे. दुसरीकडे, पुणे- नाशिक औद्योगिक दृतगती महामार्ग करण्यात येणार आहे. रस्ते विकास महामंडळाकडून मार्गाची आखणीही करण्यात आली. औद्योगिक महामार्गाला स्थानिक लोकप्रतिनिधींसह शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी मुंबईत बैठक झाली. बैठकीत सहकारमंत्री दिली वळसे पाटील, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार अतुल बेनके, अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, जिल्हाधिकारी सुहास दिवसे आदी उपस्थित होते.
‘पुणे – नाशिक रेल्वे, औद्योगिक दृतगती महामार्गामुळे खेड तालुक्यातील मोठ्या प्रमाणात जमिनी बाधित होत आहेत. यापूर्वीच्या विविध प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत. पुणे – नाशिक औद्योगिक महामार्गाच्या आखणीमुळे मोठ्या प्रमाणात पुन्हा जमिनी जाणार आहेत. हा महामार्ग चाकणपासून काही किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे त्याचा थेट औद्योगिक कंपन्यांना फायदा होत नाही. तळेगाव- शिक्रापूर मार्गावरील राशे गावात रेल्वे आणि औद्योगिक महामार्ग क्रॉस होत असून त्यामुळे गावाचे मोठे नुकसान होत आहे,’ याकडे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी बैठकीत लक्ष वेधले. ‘झिगझॅग’ पद्धतीने महामार्गाची आखणी केली असून त्याचा औद्योगिक कंपन्यांना उपयोग नाही. त्यामुळे या मार्गाला सर्व लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे, असे अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.
‘पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासाठी आखणी करण्यात आली. त्याला जोडूनच औद्योगिक महामार्गाची आखणी करता येईल का, त्याबाबत चाचपणी करा. तसेच औद्योगिक महामार्गासंदर्भात सध्या सुरू असलेले काम थांबवा,’ अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही पुणे- नाशिक औद्योगिक दृतगती महामार्ग रेल्वे मार्गाला जोडून घेता येईल का याची चाचपणी करू’, असे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.
खेड तालुक्यातील पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे, औद्योगिक महामार्ग, पुनर्वसन, कालवे, औद्योगिक महामंडळासाठी जमिनी दिल्या आहेत. आता लोकप्रतिनिधींसह शेतकऱ्यांची जमिनी देण्याची पुन्हा मानसिकता नाही. पुणे- नाशिक औद्योगिक दृतगती महामार्गाचा आम्हाला कोणताच फायदा नाही. त्यामुळे आमचा या महामार्गाला विरोध कायम आहे.
दिलीप मोहिते पाटील, आमदार खेड