मनसे आणि भाजपनं एकत्र आलं पाहिजे असं वाटतं का? राज ठाकरेंनी मनातलं सांगून टाकलं!

महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी विविध विषयांवर आपली भूमिका व्यक्त केली आहे. शिवसेना ठाकरे गटासोबत युतीसंदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होऊ शकते अशी चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान यावेळी त्यांना भाजपसोबत युती व्हावी असं वाटतं का? असाही प्रश्न विचारण्यात आला होता, या प्रश्नाला उत्तर देताना भाजपसोबत जाणं हे राजकीय होईल, पण राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? 

मी मराठी माणसाबद्दल बोलू शकतो, भाजपसोबत जाणं राजकीय होईल, सर्वच भूमिका जुळतील असं नाही. पण राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही. उद्या एकमेकांना हात जोडले जातील, हात मिळवले जातील, नमस्कार केला जाईल.  राजकारणात सर्वच गोष्टीला वेग आला आहे. कधी काय घडेल सांगता येत नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, विचारधारेत फरक आहे. महाराष्ट्र हडपण्याचा प्रकार चारही बाजुने सुरू आहे. त्यावर मी जेव्हा बोलेन तेव्हा हे सर्व पक्ष मला किती साथ देतील ते  माहीत नाही. राजकीय अ‍ॅडजस्टमेंट या वेगळ्या गोस्टी आहेत, असं राज ठाकरे यांंनी यावेळी म्हटलं आहे.

शिवसेना ठाकरे गटासोबत युतीची चर्चा  

महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटलं की,  “या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं, ही काही कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही”  असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे, राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर आता मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)