राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांची यांची पुरोगामी विचारधारा म्हणजे मुस्लिम समाजासाठी धोरणे आखणे किंवा विशेष तरतूद करणे नाही तर पुरोगामी विचार हा सर्वधर्मसमभाव सांगणारा आणि सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणारा विचार आहे. मुस्लिम समाजातील युवकांना शैक्षणिक आरक्षण मिळावे ही दीर्घकाळापासून मागणी असून हे आरक्षण मिळावे ही आमची ठाम भूमिका आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत आमच्याकडून काही चूका किंवा त्रुटी राहिल्या होत्या त्यातून बोध घेऊन दुरुस्त केल्या जातील आणि आम्ही विधानसभेला सामोरे जाऊ असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. निवडणुकीत ज्यांना यश मिळाले आहे त्यांच्याकडून काही वक्तव्य येत आहेत तर अपयशामुळे आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांची टोकाची वक्तव्य येत आहेत. परंतु येणारी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून महायुतीमध्ये कोणताही समज-गैरसमज निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.