Pune Deenanath Mangeshkar Hospital: पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी चार समित्यांकडून सुरु आहे. त्यातील ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना देण्यात आला आहे. त्यात त्या रुग्णालयास क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे संतप्त झाल्या आहेत. त्यांनी आपणास हा अहवाल अमान्य आहे, तो जाळून टाका, असे माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
ससून रुग्णालयाच्या अहवालावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्या अहवालाचा आम्ही निषेध करतो. सरकार किती असंवेदनशील आहे, हे त्यातून दिसत आहे. एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर सरकारकडून कारवाई होत नाही. जोपर्यंत त्या माऊलीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही ससून रुग्णालयाच्या समितीने दिलेला हा अहवाल स्वीकारत नाही. तो कचऱ्याचा डब्यात टाका असे म्हणणार नाही तर तो जाळून टाका, अशा संतप्त भावना सुप्रिया सुळे यांनी मांडल्या.
पक्ष प्रशांत जगतापसोबत
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्रशांत जगताप यांनी तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे कौतूक करताना खासदार सुप्रिया सुळे यांनी आमचा पक्ष पूर्णपणे प्रशांत जगताप यांच्यासोबत असल्याचे म्हटले आहे. प्रशांत जगताप येत्या २४ तारखेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात याचिका दाखल करणार आहे. याचिकेच्या माध्यमातून रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे.
काय आहे त्या अहवालात
ससूनच्या अहवालातून मंगेशकर रुग्णालयास क्लीन चिट देण्याचा प्रयत्न आहे. त्यात म्हटले आहे की, इंदिरा आयव्हीएफमध्ये तब्येतीत सुधारणा होत नसताना देखील 4-5 दिवस दाखल करून घेणे चूक होती. ही जबाबदारी आयव्हीएफ सेंटरची आहे. अती जोखमीचा रुग्ण असल्यामुळे भिसे यांना मल्टीस्पेशालिटी रुग्णालयामध्ये नेले पाहिजे होते, असे त्या अहवालात म्हटले आहे.