हिंदीवरून सेनेतील दोन्ही गट आमने-सामनेImage Credit source: गुगल
इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीवरून राज्यात वातावरण तापले आहे. शिक्षण क्षेत्रात हिंदीची ही सक्तीची घुसखोरी वादात अडकली आहे. मनसेच नाही तर उद्धव ठाकरे शिवसेनेने सुद्धा या हिंदीच्या सक्तीकरणाविरोधात एल्गार पुकारला आहे. त्यावरून शिवसेनेतील दोन्ही गट आमने-सामने आले आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.
ही तर मातृभाषेशी गद्दारी
उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी याप्रकरणी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर हल्ला चढवला आहे. त्यांनी सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी सरकारच्या भूमिकेवर आणि संजय शिरसाट यांच्यावर तुफान हल्लाबोल चढवला आहे. यामध्ये सरकारला काही प्रश्न सुद्धा विचारण्यात आले आहे. सरकारने कोणत्या आधारे ही सक्ती केली असा सवाल करण्यात आला आहे.
स्वार्थासाठी गद्दारी फक्त पक्षाशी करून थांबला नाहीत, शिरसाट तुम्ही तर महाराष्ट्राशी,आपल्या मातृभाषेशी पण गद्दारी करत आहात, असा घणाघात चित्रे यांनी केला. भाषांसंदर्भात घटनेत काय म्हटलंय,हे महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याला माहीत नसणे ही तर शोकांतिका आहे, असा चिमटा चित्रे यांनी काढला. तर हिंदीला राष्ट्रीय भाषा म्हणून प्रचार करणाऱ्या बेजबाबदार राज्यकर्त्यांसाठी त्यांनी माहिती सुद्धा दिली आहे.
स्वार्थासाठी गद्दारी फक्त पक्षाशी करून थांबला नाहीत @SanjayShirsat77 तुम्ही तर महाराष्ट्राशी,आपल्या मातृभाषेशी पण गद्दारी करत आहात.
भाषांसंदर्भात घटनेत काय म्हटलंय,हे महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याला माहीत नसणे ही तर शोकांतिका.
(खालील माहिती हिंदी ला राष्ट्रीय… pic.twitter.com/kZMivW1O8v— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) April 18, 2025
हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा नाही
भारतीय राज्यघटनेच्या कलम 343 मधील पहिल्या अनुच्छेदानुसार हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही. देवनागरी लिपीतील हिंदी ही संघराज्याची अधिकृत किंवा कामकाजाची भाषा असेल, असं घटनेत सांगण्यात आलंय, असे चित्रे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.
कलम 345 नुसार घटनेनं प्रत्येक राज्याला स्वत:ची अधिकृत आणि कामकाजाची भाषा ठरवण्याचाही अधिकार दिला आहे. घटनेच्या आठव्या शेड्युलमध्ये भारतातील अधिकृत भाषांची एक यादी आहे. त्यामध्ये मराठी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, उर्दू, बंगाली, काश्मिरी, अशा 22 भाषांचा समावेश आहे, अशी यादी चित्रे यांनी संजय शिरसाट यांच्यासाठी दिली आहे. यावर आता संजय शिरसाट हे काय बोलतात हे लवकरच समोर येईल.