आपण कधी झोपेत तोंड उघडं ठेवून झोपणाऱ्या व्यक्तीकडे लक्ष दिलं आहे का? किंवा सकाळी उठल्यावर तोंड कोरडं, गळा खवखवणारा आणि तोंडातून दुर्गंध येत असल्याचं जाणवलं आहे का? हे सर्व लक्षणं तुमच्यात आढळत असतील, तर याकडे दुर्लक्ष न करता वेळीच खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण झोपताना तोंड उघडं ठेवणं ही काही साधी सवय नाही, तर आरोग्याला हळूहळू हानी पोहोचवणारही गोष्ट आहे.
तोंड उघडं राहण्याची दोन प्रमुख कारणं असू शकतात. पहिलं म्हणजे नाकातून श्वास घेण्यास अडथळा येणे, जसं की सर्दी, सायनस किंवा अॅलर्जी. अशावेळी शरीर आपोआप तोंडातून श्वास घेऊ लागतं. दुसरं कारण म्हणजे चुकीच्या झोपण्याच्या सवयी, जसं की पोटावर किंवा पाठीवर झोपणं, ज्यामुळे तोंड उघडं राहतं.
या सवयीचे दुष्परिणाम अनेक आहेत. सर्वात आधी, तोंडातून श्वास घेतल्याने लाळ लवकर सुकते, ज्यामुळे तोंड कोरडं पडतं आणि दुर्गंध येऊ लागते. यामुळे रात्री तहान लागते, झोपमोड होते. तोंडातून श्वास घेतल्याने शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे थकवा, डोकेदुखी आणि एकाग्रता कमी होण्यासारखे त्रास सुरू होतात.
याशिवाय, लाळेचं प्रमाण कमी झाल्याने तोंडात बॅक्टेरियांची वाढ होते आणि दातांवर परिणाम होतो. दातांची कीड, हिरड्यांना सूज आणि दुर्गंध यामुळे रोजचं जीवन त्रासदायक होतं. काही लोक घोरण्याच्या समस्येनेही ग्रस्त असतात, जी त्यांच्यासह त्यांच्या जोडीदाराचीही झोप बिघडवते.
विशेषतः लहान मुलांमध्ये ही सवय गंभीर ठरू शकते. दीर्घकाळ तोंड उघडं ठेवून झोपल्याने चेहऱ्याच्या हाडांच्या रचनेवर परिणाम होतो. यामुळे चेहरा लांबसर आणि बारीक दिसतो, ज्याला ‘लॉन्ग फेस सिंड्रोम’ असं म्हणतात. त्यामुळे पालकांनी मुलांच्या झोपण्याच्या पद्धतीकडे विशेष लक्ष द्यावं.
या समस्येपासून सुटका हवी असेल, तर काही उपाय करून पाहावेत. झोपण्यापूर्वी नाक साफ करणं, वाफ घेणं, बाजूने झोपणं, खोलीत ह्युमिडिफायर ठेवणं आणि गरज भासल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने तोंड बंद ठेवण्यासाठी स्ट्रिप्स वापरणं फायदेशीर ठरू शकतं.
तोंड उघडं ठेवून झोपणं ही छोटीशी सवय वाटू शकते, पण तिचे परिणाम गंभीर असू शकतात. त्यामुळे हसण्यावारी नेण्याऐवजी या संकेतांकडे लक्ष द्या आणि गरज असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुमची झोप सुधारली, तर तुमचं आरोग्यही निश्चितच बळकट होईल!