मुंबई, ठाणे वगळता इतर ठिकाणी युती होणं अवघड, नीलम गोऱ्हेंचं मोठं विधान!

 Neelam Gorhe : राज्यातील राजकीय पक्षांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. नाशिक, पुणे, मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्ष रणनीती आखत आहेत. पुन्हा एकदा युती आणि आघाड्यांचा खेळ चालू झाला आहे. असे असतानाच आता शिवसेना पक्षाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युतीबाबत मोठं विधान केलं आहे. मुंबई, ठाणे वगळता इतर ठिकाणी युती होणे अवघड आहे, असं त्या म्हणाल्या आहेत. त्या पुण्यात शिवसेनेच्या सभासद नोंदणी अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होत्या.

पण अवलंबून राहू नका…

मुंबई, ठाणे वगळता इतर ठिकाणी युती होणे अवघड आहे. झाली तर आनंद आहे. पण अवलंबून राहू नका, असा संदेशच नीलम गोऱ्हे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. तसेच कार्यक्रमानंतर माध्यम प्रतिनिधींशी बातचित करताना “आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सभासद नोंदणी करण्यास सांगितलेलं आहे. पुण्यातील काही विधानसभा मतदारसंघांमध्ये आता आम्ही सभासद नोंदणी सुरू करणार आहोत,” अशी माहिती त्यांनी दिली.

सर्वस्वी निर्णय आमचे वरिष्ठ नेते घेतील

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची नुकतीच भेट झाली आहे. या भेटीनंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी या दोन्ही पक्षांची युती होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “युती होईल का नाही हे माहिती नाही. याचा सर्वस्वी निर्णय आमचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे, देवेंद्रजी फडवणीस आणि अजित पवार घेतील. आपण आपलं काम करत राहतो आणि चांगल्या प्रमाणात पक्ष वाढवावा तेवढेच मला वाटतं. योग्य निर्णय वरिष्ठ घेतील,” अशी सावध प्रतिक्रिया गोऱ्हे यांनी दिली.

बाळासाहेबांनी काँग्रेसवर टीका केली, त्याचबरोबर…

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा नाशिकमध्ये 16 एप्रिल रोजी मेळावा पार पडला. या मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांचे एआय आवाजातील भाषण कार्यकर्त्यांना ऐकवण्यात आले. यावरही गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर टीका केली. “ते संपूर्ण भाषण मी पाहिलेला आहे. शेवटी ही टेक्नॉलॉजी आहे. जे आपण सांगू तेच त्यामध्ये येतं. बाळासाहेबांनी काँग्रेसवर टीका केली होती. त्याचबरोबर मी पंतप्रधान असतो, तर लाल चौकात जाऊन ध्वजवंदन केलं असतं, असं म्हटलं होतं. हेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी केलं. 370 कलम हटवलं, तीन तलाक कायदा आणला. त्याचबरोबर लाल चौकात ध्वजवंदन झालं. त्यामुळे खरा विचार आणि खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली पुढे जात आहे,” असे म्हणत बाळासाहेबांचे विचार आम्हीच पुढे नेत आहोत, असा अप्रत्यक्ष दावा गोऱ्हे यांनी केला.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)