…यामुळे वाघ्या कुत्र्याचा विषय थांबवला होता, संभाजीराजे भोसले यांची माहिती

Raigad waghya dog statue Controversy : रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा विषय थांबवला नाही. तो काही काळ स्थगित केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगड दौऱ्यावर होते. त्यामुळे हा विषय काही काळ थांबवला होता. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहोत. मुळात वाघा कुत्र्याचा विषय एक दंतकथा आहे. या दंतकथेतून निर्माण झालेले पात्र शिवाजी महाराज यांच्या समाधीशेजारी नको, असे संभाजीराजे भोसले यांनी सांगितले. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर ते गुरुवारी माध्यमांशी बोलत होते.

संभाजीराजे काय म्हणाले…

संभाजीराजे भोसले यांनी वाघ्या कुत्र्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर हा विषय चर्चेला आला. वाघ्या कुत्र्याची रायगडावरील प्रतिमा हटवण्यास संभाजी भिडे, लक्ष्मण हाके यांनी विरोध केला. परंतु संभाजीराजे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. गुरुवारी ते मुंबईत आले. त्यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले, वाघ्या कुत्र्याचा विषय एक दंतकथा आहे. दंतकथेतून निर्माण झालेले चित्र शिवाजी महाराज यांच्या समाधीशेजारी उभे राहणे चुकीचे आहे. वाघ्या कुत्र्याबाबत मी सविस्तर सांगितले आहे. त्या कुत्र्याची प्रतिमा त्या ठिकाणावरुन काढायला हवी.

संभाजीराजे पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांच्या समाधासाठी देणगी देणारे तुकोजीराव होळकर यांचे नाव सुवर्ण अक्षरात त्या ठिकाणी लिहिले जावे, ही जबाबदारी मी घेतली आहे. मी या सर्व विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार आहे. आज किंवा उद्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत माझी चर्चा होईल. त्यावेळी या प्रकरणात समिती स्थापन करण्यासंदर्भात चर्चा होईल. अमित शाह रायगडला येणार होते, त्यामुळे काही काळासाठी मी विषय थांबवला होता. वाघ्या कुत्र्याची प्रतिमा काढण्याबाबत आमची कोणतीही डेडलाईन नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीबाबत बोलताना संभाजीराजे म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळेसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. ते राज्याचे महसूल मंत्री आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील स्टेडियमची फाईल त्यांच्याकडे आली आहे. त्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण आलो होतो.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)