राज्यात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग, 20 एप्रिल रोजी नव्या आघाडीवर शिक्कामोर्तब?

राजू शेट्टी, महादेव जानकर, बच्चू कडूImage Credit source: TV 9 Marathi

महाराष्ट्राचे राजकारण युती आणि आघाडीवर सुरु झाले आहे. राज्यात शिवसेना-भाजप युती होती. त्यानंतर त्या युतीमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आल्यानंतर महायुती झाली. महायुतीला आव्हान देण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी निर्माण झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना सोबत घेऊन तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो यशस्वी झाला नाही. आता राज्यातील तीन बडे नेते राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर एकत्र येत आहे. त्या नेत्यांनी तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यावर येत्या २० एप्रिल रोजी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांचा २० एप्रिल रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त बच्चू कडू मोठा निर्णय घेणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने पुण्यात युवा संघर्ष निर्धार परिषद भरवली आहे. त्यावेळी महादेव जानकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मेळाव्याच आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला बच्चू कडू आणि राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत. या दिवशी राजू शेट्टी आणि बच्चू कडू मोठा निर्णय जाहीर करणार आहेत.

राज्यात तिसरी आघाडी निर्माण होण्याची शक्यता राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर या तिन्ही नेत्यांच्या माध्यमातून झाली आहे. हे तिन्ही नेते एकत्र येत मोठा निर्णय घेणार आहे, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली. त्यासाठी त्यांनी फुले वाड्यात येण्याचे आवाहन सर्व कार्यकर्त्यांना केले आहे. यामुळे २० एप्रिल रोजी राज्याच्या राजकारणाचे लक्ष फुले वाडा राहणार आहे.

पुणे शहरात २० एप्रिल रोजी ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’ होणार आहे. खोट्या आश्वासनांना कंटाळलेल्या तरुणांचा बुलंद निर्धार.! या टॅगलाईन खाली परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या मेळाव्यातून राज्यातील सत्ताधाऱ्यांना टीकेचे लक्ष केले जाणार आहे. राज्यात तयार होणारी ही तिसरी आघाडी प्रबळ विरोधक ठरणार का? या प्रश्नाचे उत्तर आगामी काळात मिळणार आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)