Mumbai Weather : मुंबईकरांसाठी यंदा मान्सूनची चांगली बातमी आहे. मुंबई आणि उपनगरात चांगल्या पावसाचे संकेत आहे. मुंबईत सामान्यपेक्षा जास्त पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागानुसार, जास्त पावसाचा अंदाज हा 65% आहे. हवामान विभागाचा अंदाज बरोबर ठरल्यास मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.
मुंबईसारख्या दाट लोकवस्ती आणि मोठी लोकसंख्या असलेल्या शहरात पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मुंबईला होणारा सर्व पाणी पुरवठा तलावांद्वारे केला जातो. तलावांमध्ये साचणारे पावसाचे पाणी वर्षभर मुंबईची तहान भागवते. यामुळे चांगला पाऊस पडला तर मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही.
प्रादेशिक हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर म्हणाल्या की, प्राथमिक अंदाजानुसार मुंबईत सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता 65% आहे. तथापि, हवामान विभागाकडून आणखी एक अहवाल प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यात यंदाच्या मान्सून पॅटर्नबाबतची परिस्थिती अधिक स्पष्ट होईल.
हवामान खात्याच्या प्राथमिक अंदाजानुसार, यंदा मुंबईसह महाराष्ट्रात मान्सून चांगलाच बरसणार आहे. राज्यातील सर्वच भागांत मान्सून सक्रीय असणार आहे. काही ठिकाणी सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक भागात अतिवृष्टीची शक्यता आहे.
मुंबईत तापमान घसरले
मुंबईच्या दिशेने वाहणारे वारे सक्रिय झाले आहेत. यामुळे मुंबई महानगरात दिवसाच्या तापमानात घट झाली आहे. मंगळवारी मुंबईत कमाल तापमान 36.2 अंश सेल्सिअस होते, परंतु बुधवारी ते 34.8 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. मुंबईत तापमान कमी झाले असले तरी आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. मुंबईतील रात्रीच्या तापमानात कोणताही बदल झालेला नाही.
देशात कशी असणार परिस्थिती
- सरासरीपेक्षा कमी पाऊस
- जम्मू आणि काश्मीर, लडाख, तामिळनाडू, बिहार, ईशान्य भारतातील काही भाग
- सामान्य ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस
- मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल