हा तर बाळासाहेबांचा अपमान…त्यांचा आत्मा…AI भाषणावर शिंदेंच्या सेनेचा जोरदार हल्लाबोल!

Naresh Mhaske Vs Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचा नाशिकमध्ये भव्य मेळावा 16 एप्रिल रोजी पार पडला. या मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील AI भाषण शिवसैनिकांना ऐकवण्यात आले. म्हणूनच या भाषणाची आणि नाशिकच्या मेळाव्याची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. बाळासाहेबांच्या या एआय भाषणात शिवसेना फुटीवर भाष्य करण्यात आलंय. याच भाषणात निष्ठावंत म्हणून घेणारे गद्दार निघाले, असंही या म्हणण्यात आलंय. आता याच भाषणावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिलीय. बाळासाहेबांच्या बनावट आवाजाचा उपयोग करावा लागतोय याचे वाईट वाटतेय. बाळासाहेबांचे खरे विचार आमच्यासोबत आहेत, असं म्हणत म्हस्केंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

बाळासाहेबांच्या आवाजाची नक्कल करून…

“त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले आहेत. बाळासाहेबांच्या बनावट आवाजाचा उपयोग करावा लागला याचं वाईट वाटत आहे. पण बाळासाहेबांचा ओरिजनल विचार आमच्यासोबत आहे. त्यांना बनावट कॅसेटचा उपयोग करावा लागला आहे,” अशी खोचक टीका नरेश म्हस्केंनी केला. तसेच बाळासाहेबांच्या आवाजाची नक्कल करून आमच्यावर टीका करत आहेत. बाळासाहेबांचा आत्मा काय म्हणत असेल,” असे म्हणत त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनाला डिवचलं.

हा बाळासाहेबांचा अपमान आहे

“त्यांचा पक्ष शिल्लक राहिलेला नाही. त्यांना सर्वच सोडून चालले आहेत. म्हणून बाळासाहेबांच्या आवाजात बोलायला लावून बनावटगिरी करत आहेत. हा बाळासाहेबांचा अपमान आहे,” असा हल्लाबोल म्हस्के यांनी केला.

तुमचे हिंदुत्व जगाला कळले आहे

उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर बोलताना भाजपावर सडकून टीका केली. यालाच उत्तर म्हणून “बाळासाहेबांची वक्फ कायदा रद्द करण्याची मागणी होती. त्यांनी मेळावा सभागृहात का घेतला. हा मेळावा मैदानात घ्यायचा होता ना सावरकरांचा अपमान कोणी केला? शिवाजी महाराजांचा अनादर कोणी केला? तुमचे हिंदुत्व जगाला कळले आहे,” असं प्रत्युत्तर नरेश म्हस्केंनी दिलं.

दाढी वाढवण्याकरता…

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांची नक्कल केली. तसेच दाढीचा उल्लेख करून त्यांनी शिंदेंनाही डिवचलं. “हातात तलवार पकडायला मनगटात जोर लागतो. आपला सर्व जोर फेसबुक वरती आहे. दाढी वाढवण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हृदयात लागतो. तोही विचार तुमच्यात नाही. दाढी, तलवार आणि मनगट या गोष्टी विसरून जा,” अशी जोरदार टीका नरेश म्हस्के यांनी केली.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)