Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात भाजपा, एकनाथ शिंदे यांना चांगलंच घेरलं. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यापासून ते वक्फ विधेयकापर्यंतचा उल्लेख करून ठाकरेंनी आपल्या भाषणात तुफान टोलेबाजी केली. आपल्या याच भाषणात आता ठाकरेंनी आगामी निवडणुकीचा प्लॅनही आपल्या कार्यकर्त्यांना दिला. विशेष म्हणजे भाजपाने निवडणूक जिंकण्यासाठी ज्या पद्धतीने आपली रणनीती आखली आहे, अगदी त्याच धर्तीवर ठाकरेदेखील आपले संघटन बांधण्याच्या तयारीत आहेत. याबाबतची सगळी माहितीच ठाकरेंनी आपल्या भाषणात दिली आहे.
ठाकरेंनी सांगितला भाजपाचा प्लॅन काय?
“आपली तयारी कशी पाहिजे. सकाळी विनायक राऊतांनी बुथ मॅनेजमेंटचं मार्गदर्शन केलं. माझ्याकडे भाजप महाराष्ट्र, बुथ समिती गठणचा तपशील आहे. हे मुंबईचं आहे. आपलीही लोकं असतात हो इकडे-तिकडे. असं काही नाही की त्यांचीच लोकं आपल्याकडे असतात. त्यांच्याकडे काय चाललंय हे मला रोज कळतंय. त्यांनी कसं केलंय मांडणी कशी केली, हे मुद्दाम सांगतो,” असे ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले. माझ्याकडे सर्व विभाग आहे. सर्व सांगणार नाही. नाही तर कोणी पाठवलं ते कळेल. त्यात जबाबदारीचा एक विषय आहे. हे सारं मुंबईचं आहे, असंही त्यांना सांगितलं.
आपणही तशीच तयारी केली पाहिजे- ठाकरे
“भाजपाकडे एक बुथ अध्यक्ष आहे. त्याच्यापुढे त्या व्यक्तीचं नाव आणि मोबाईल नंबर आहे. नंतर बुथ सरचिटणीस आहे. त्यांचे पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर आहे. मग सदस्य आहेत. लाभार्थी प्रमुखही आहेत. लाभार्थी प्रमुखाचेही नाव आणि मोबाईल नंबर आहे. त्यांनी सदस्यांच्या रकान्यात त्यांनी दहा सदस्यांची नावे दिली आहेत. प्रत्येकाचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर, अशी त्यांची तयारी आहे. अशी तयारी आपण केली पाहिजे,” असे आवाहन ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना केले.
12 सदस्यांचं गणित सांगितलं
“पुढे त्यांनी एक सूचना दिलेली आहे कीत की 12 सदस्यांमध्ये किमान तीन महिला प्रतिनिधी असाव्यात. नंतर किमान एक एससी आणि एसटी प्रतिनिधी असावा. ही त्यांची मांडणी आहे. या मांडणीने ते पुढे चालले आहेत. ईव्हीएम घोटाळा आहे. तो जरूर आहे. योजनांचं गारूड नक्की आहे. पण बुथ मॅनेजमेंटही महत्त्वाचं आहे. आपले बुथ प्रमुख आणि पोलिंग एजंट यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे. बुथ प्रमुख हा यादीतील प्रत्येकाला नावानिशी चेहऱ्यासकट ओळखणारा पाहिजे. त्या टीममधला एक पोलिंग एजंट पाहिजे. असेल तर त्याला कळलं पाहिजे मतदानाला आलेला माणूस मतदानाच्या यादीतला आहे की नाही. त्याचा चेहरा जुळतोय की नाही,” असे ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.
ठाकरेंचा प्लॅन यशस्वी ठरणार का?
दरम्यान, आता ठाकरेंनी आपल्या पक्षाने निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी काय तयारी करायला हवी, याची प्रातिनिधीक माहितीच आपल्या कार्यकर्त्यांना दिली आहे. त्यामुळे आगामी काळात या आराखड्यावर ठाकरेंच्या पक्षात नेमकं काय काम होणार? भाजपाच्या धर्तीवर ठाकरे पक्षाचं संघटन बांधणार असतील तर आगामी निवडणुकांत त्यांना किती यश येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.