पुणे : कोणीही आर्थिक कारणासाठी शिक्षणापासून वंचित राहू नये. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य व्हावे यासाठी शैक्षणिक निधी उभारण्याचा मानस अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य डी वाय पाटील यांनी व्यक्त केला.
सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील आणि मनीषा पाटील यांनी तेजनाथ बाबा यांच्या उपस्थितीत अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाला एक कोटी रुपयांची देणगी दिली. यावेळी डॉ. पाटील बोलत होते. विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. एकनाथ खेडकर, कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. कमलजीत कौर, सल्लागार शंकर नारायण, उद्योजक अशोक खांदवे, रमेश पाटील यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.
डॉ. अजिंक्य पाटील म्हणाले, गोरगरीबांसाठी शिक्षण उपलब्ध व्हावे असे स्वप्न मी पाहिले आहे. फी भरता आली नाही म्हणून कोणी शिक्षणापासून वंचित राहिला असे व्हायला नको. त्यासाठीच शैक्षणिक निधी उभारण्याचा मानस आहे. रमेश पाटील यांच्या देणगीने याची सुरूवात झाली आहे.
रमेश पाटील म्हणाले, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. हा संस्कार डॉ. डी. वाय. पाटील यांनी दिला. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर काम करत आहे.डॉ. एकनाथ खेडकर म्हणाले, समाजकार्यात वाहून घेतलेले सर्वच जण वंदनीय असतात. रमेश पाटील यांचे शैक्षणिक कार्य मोठे आहे. तेजनाथ बाबा यांनी या कार्यक्रमास शुभाशिर्वाद दिले.