Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या मेळाव्यात जोरदार भाषण केले. आपल्या या भाषणात त्यांनी भाजपावर सडकून टीका केली. त्यांनी राज्य सरकारच्या महिलाविषयक, शेतकरीविषयक धोरणावर बोट ठेवलं. तसेच महायुतीने निवडणुकीवेळी भरपूर आश्वासनं दिली, पण त्या आश्वासनांचं काय झालं? असा सवाल केला. सोबतच त्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या विधानाचाही समाचार केला. शेतकऱ्यांनी कर्ज काढलं, तुझ्या बापाचं काय चाललंय? असा थेट हल्लाबोल ठाकरेंनी केला.
त्यांनी दणादण घोषणा जाहीर केल्या, पण….
भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात काही वचनं दिली होती. थापा मारल्या होत्या. शेतकऱ्यांचे आम्ही कर्ज माफ करू, माताभगिनींना आम्ही 2100 रुपये देऊ असे सांगितले होते. किती रुपये महिलांच्या खात्यावर आले. त्यांनी दणादण घोषणा जाहीर केल्या. पण आता सांगत आहेत, फक्त 500 रुपयेच मिळतील. मग माताभगिनींना फसवून का मते घेतलीत? असा रोखठोक सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
कोकाटे अगोदर बोंबलत होते की….
पुढे बोलताना त्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या विधानाचीही समाचार घेतला. ” माझ्या शेतकऱ्यांनाही त्यांनी फसवले. कोकाटे अगोदर बोंबलत होते की 31 मार्चपर्यंत मनो किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जातील. पण पैसे आले का? आज तारीख 16 एप्रिल तारीख आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले का?” असा हल्लाबोल ठाकरेंनी केला.
त्यांच्या बापाचे काय जात आहे?
“शेतकऱ्यांची चेष्ठा चालू आहे. कोकाटे म्हणाले कर्जमाफी कशाला पाहिजे, लग्न कराला का? पण त्यांच्या बापाचे काय जात आहे. आम्ही कर्ज काढतोय, शेती करतोय. तुम्हाला काय करायचे आहे,” असो थेट सवाल ठाकरेंनी केला. तसेच शेतकरी आत्महत्या करतो, त्या घरात कधी मंत्री जातो का? असा प्रश्नही ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
मी मेलो तरी हिंदुत्त्व सोडणार नाही
पुढे बोलताना ठाकरेंनी हिंदुत्त्वावरही भाष्य केलं. “आम्ही जे करायचं ते उघडपणे करतो. आमच्या मनात कधी पाप नसतं. आमचं हिंदुत्त्व एवढं तकलादू नाही. एखादी गोष्ट केली आणि एखादी गोष्ट केली नाही म्हणून आम्ही भष्ट झालो. कुणाची सावली पडली म्हणून आम्ही बाटलो, असं थोतांड हिंदुत्त्व आमचं नाही,” असं ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. तसेच मी भाजपाला सोडलं. मी हिंदुत्त्व सोडलं नाही. मी मेलो तरी हिंदुत्त्व सोडणार नाही, असंही ठाकरेंनी स्पष्ट केलं.