Raj Thackeray and Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या बंगल्यावर शिंदे आणि ठाकरे यांच्यात ही भेट झाली आहे. विशेष म्हणजे महापालिका निडवणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता आहे, अस असताना शिंदे आणि ठाकरे यांच्यात ही भेट होत आहे. याच भेटीवर शिलसेना पक्षाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
भेटीदरम्यान सामंतांची विशेष उपस्थिती
गेल्या काही दिवसांपासून मंत्री उदय सामंत हे राज ठाकरे यांची भेट घेत आहेत. या दोन्ही नेत्यांत एकूण दोन वेळा भेट झालेली आहे. त्यावेळी आमच्या या भेटीचा कोणीही राजकीय अर्थ काढू नये, अशी प्रतिक्रिया सामंत यांनी दिली होती. त्यानंतर आता राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात भेट झाली आहे. या भेटीदरम्यान उदय सामंत हेदेखील उपस्थित आहेत. सोबतच राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, मनसेचे नेते अविनाश देशपांडे आदी नेतेदेखील या भेटीसाठी उपस्थित आहेत.
मला एकनाथ शिंदे यांचा आदेश आला
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठीची पार्श्वभूमी उदय सामंत यांनीच तयार केली आहे. एकनात शिंदे यांचे दूत म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यामुळेच आजच्या भेटीत उदय सामंत हेदेखील उपस्थित आहेत. या भेटीला पोहोचताना त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना “आधी प्रथम मी खुलासा करतो की मी कुर्ल्याच्या कार्यक्रमात होतो. मला निरोप आला की तातडीने या. त्यामुळेच मी आलो आहे. मी दोन वेळा राज ठाकरेंना का भेटण्यासाठी गेलो होतो, हे तेव्हाच सांगितलं आहे. भेटीचं कारण काय आहे, हे मला माहिती नाही. मला एकनाथ शिंदे यांचा आदेश आला, त्यामुळे मी इथे आलो आहे,” असे स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलं.
…तर आनंदच होईल
तसेच, या बैठकीत जी चर्चा होईल ती मी तुम्हाला सांगतो. शिवसेना पक्षाचे नेते एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्याकडे स्नेहभोजनासाठी येत असतील तर त्यातून राजकीय अर्थ काढले जाणं स्वाभाविक आहे. राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत येत असतील तर आनंदच आहे, असे सूचक भाष्य उदय सामंत यांनी केले.
त्यामुळे आता राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीतून नेमकं काय समोर येणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.