इंजेक्शन, गोळी की सिरप… उपचारात कोणता प्रकार सर्वात जलद आणि प्रभावी ठरतो, हे जाणून घ्या!

आपण आजारी पडलो की डॉक्टरकडे धाव घेतो. डॉक्टर आपली प्रकृती तपासून त्यानुसार औषधं सुचवतात. ही औषधं कधी गोळ्या, कधी कॅप्सूल, तर कधी सिरप, इंजेक्शन किंवा इन्हेलर अशा वेगवेगळ्या स्वरूपात असतात. मात्र, यापैकी कोणतं औषध सर्वात प्रभावी आहे, हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. खरं तर याचं उत्तर तुमच्या आजाराच्या प्रकारावर, तीव्रतेवर आणि शरीराच्या सहनशक्तीवर अवलंबून असतं. औषधाचा कोणता फॉर्म प्रभावी ठरेल, हे डॉक्टर रुग्णाच्या स्थितीप्रमाणे ठरवतात.

गोळ्या आणि कॅप्सूल

गोळ्या आणि कॅप्सूल हा औषधांचा सर्वात सामान्य आणि सोयीचा पर्याय मानला जातो. या औषधांना हाताळणं सोपं असतं आणि त्यांचा खर्चही कमी येतो. मात्र, हे औषध शरीरात पचन प्रक्रियेनंतरच रक्तात मिसळतं, त्यामुळे तात्काळ परिणामाची आवश्यकता नसलेल्या आजारांमध्येच यांचा वापर केला जातो. ताप, डोकेदुखी, ॲलर्जी, रक्तदाब अशा साध्या त्रासांवर डॉक्टर गोळ्या किंवा कॅप्सूल देतात.

सिरप

ज्यांना गोळ्या गिळणं कठीण वाटतं, अशा लहान मुलं व वृद्धांसाठी सिरप हा योग्य पर्याय ठरतो. या औषधांची चव बहुतेक वेळा गोडसर असते, जेणेकरून लहानग्यांना औषध घेणं सोपं जावं. मात्र, सिरपची मात्रा डॉक्टरांच्या सूचनेनुसार काटेकोरपणे मोजूनच द्यावी लागते, अन्यथा दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

इंजेक्शन

जेव्हा रुग्णाची स्थिती गंभीर असते किंवा औषधाचा तात्काळ परिणाम हवा असतो, तेव्हा इंजेक्शनचा पर्याय निवडला जातो. इंजेक्शन थेट रक्तप्रवाहात, स्नायूमध्ये किंवा त्वचेखाली दिलं जातं, त्यामुळे औषध त्वरीत काम करतं. ॲलर्जिक शॉक, गंभीर संसर्ग, ऑपरेशनपूर्व स्थिती, मधुमेहासाठी इन्सुलिन किंवा उच्च ताप अशा वेळेस इंजेक्शन दिलं जातं.

कोणतं औषध कोणत्या स्वरूपात घ्यावं, हे पूर्णपणे रुग्णाच्या वयावर, आजाराच्या तीव्रतेवर आणि औषधाचा अपेक्षित परिणाम किती लवकर हवा आहे यावर अवलंबून असतं. डॉक्टरच रुग्णाची स्थिती समजून योग्य औषध आणि त्याचं स्वरूप ठरवतात.

औषधाचं स्वरूप डॉक्टरांच्या सल्ल्याविना बदलणं आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकतं. गोळ्याऐवजी सिरप, सिरपऐवजी इंजेक्शन किंवा इंजेक्शनऐवजी गोळ्या घेणं हे चुकीचं आणि धोकादायक असू शकतं. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या औषधाच्या स्वरूपावर पूर्ण विश्वास ठेवणं आवश्यक आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)