वाहतूक धोरणाचा भाग
पालिका प्रशासनाने शहरासाठी वाहतूक धोरण तयार केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात काही ठिकाणी ‘पे अँड पार्क’ योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. शहर आणि परिसरात नागरिकरण वेगाने वाढत आहे. वाढत्या नागरिकरणामुळे शहराच्या वर्दळीत झपाट्याने वाढ होत आहे. वाहने अनधिकृतरीत्या आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होईल या पद्धतीने उभी केली जात आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस वाहतूक समस्या जटील होऊ लागली आहे. त्यावर उपाययोजना राबविणे क्रमप्राप्त होते.
चार ठिकाणीच अंमलबजावणी
शहरातील नागरिकांसाठी वाहतूक सुरळीत होणे आणि पार्किंगची सुविधा उपलब्ध होणे, या अनुषंगाने पालिकेने वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने ‘पे अँड पार्क’ धोरण तयार केले होते. त्याअंतर्गत शहरातील १३ मुख्य रस्ते, ८० जागांवर ४५० ‘पे अँड पार्क’ची ठिकाणे निश्चित केली होती. पहिल्या टप्प्यात १६ ठिकाणी धोरण प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रत्यक्षात चारच ठिकाणी धोरणाची अंमलबजावणी करण्यात आली.
परवडत नसल्याचे पत्र
चिंचवड गावातील चापेकर चौक, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील संत मदर तेरेसा उड्डाणपूल, भारतरत्न जे. आर. डी. टाटा उड्डाणपूल, नाशिक फाटा आणि निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपूल या ठिकाणी योजना कार्यान्वित होती. त्याचे काम ‘निर्मला ऑटो केअर संस्थे’ला सात एप्रिल २०२१ला देण्यात आले. त्यानंतर योजना आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे पत्र या संस्थेने पालिका प्रशासनाला दिले होते. मात्र, कराराचा कालावधी संपुष्टात येईपर्यंत योजना कशीबशी चालू होती. कामाची मुदत सहा एप्रिल २०२४ला संपल्यानंतर नागरिकांकडून होणारी शुल्क वसुली बंद करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने जाहीर केले.
आता नव्याने अभ्यास
पालिका आणि ठेकेदाराचा ५०-५० टक्क्यांचा फॉर्म्युला ठरला होता. त्यासाठी प्रशासनाने सहा पॅकेज तयार केली होती. त्यापैकी एका पॅकेजनुसार योजनेची अंमलबजावणी केली होती, तर उर्वरित पाच पॅकेजची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार होती. यामध्ये शहरातील प्रमुख रस्त्यांचा समावेश होता. मात्र, प्रायोगिक तत्त्वावर योजना यशस्वी होऊ शकली नाही. त्यामुळे उर्वरित ठिकाणी योजना कार्यान्वित करण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. आता नव्याने अभ्यास करून योजनेचा तपशील जाहीर केला जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, तो कधी जाहीर केला जाईल, या प्रश्नाचे उत्तर मात्र दिले नाही.
योजनेसाठी पुन्हा प्रयत्न
प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली ‘पे अँड पार्क’ योजना पुढील काळात कायमस्वरूपी राबवण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनातर्फे केला जाणार आहे. त्या अनुषंगाने बेंगळुरू आणि कोईमतूर शहरांचा अभ्यास करण्यात आला आहे. वाहनांची वाढती संख्या आणि शहराची गरज लक्षात घेऊन योजनेचा नवा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. त्यानंतर योजना कार्यान्वित करण्याचा विचार आहे.
महापालिकेने शहरासाठी वाहतूक धोरण ठरविले आहे. त्याअंतर्गत पोलिसांच्या सहकार्याने प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणी ‘पे अँड पार्क’ योजना राबवली. त्याबाबत ‘निर्मला ऑटोकेअर सेंटरला’ एप्रिल २०२१मध्ये काम देण्यात आले. या कामाची मुदत एप्रिल २०२४मध्ये संपुष्टात आली. त्यामुळे शुल्क वसुली बंद करण्यात आली आहे.
– प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता, स्थापत्य प्रकल्प विभाग, पिंपरी-चिंचवड