दादरमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून हंडा मोर्चा काढण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून दादर, माहिम आणि शिवाजी पार्क परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यामुळे आता ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत पालिका कार्यालयावर हंडा मोर्चा काढला आहे. सध्या या परिसरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरु आहे.
गेल्या काही दिवसांपासून दादर, माहिम आणि शिवाजी पार्क परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याच कारणाने आता शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. शिवसेना भवन परिसरात ठाकरे गटाकडून हंडा मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले होते. आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वात पालिका कार्यालयावर हा हंडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
सध्या शिवसेना भवन परिसरात पोलीस दाखल झाले आहेत. या आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जोपर्यंत पाणी नाही, तोपर्यंत संघर्ष थांबणार नाही, असे फलक हातात घेऊन सध्या आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत आहेत. सध्या पोलिसांकडून या आंदोलकांची धरपकड सुरु आहे. अनेक महिला कार्यकर्त्याही या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. ठाकरे गटाकडून हा हंडा मोर्चा सुरु आहे.
आम्ही शांतपणे मोर्चा काढतोय. माझ्या हातात हंडा नाही. आम्ही इथून अजिबात हटणार नाही, अशी आक्रमक प्रतिक्रिया शिवसेना नेत्या श्रद्धा जाधव यांनी दिली. तर महेश सावंत यांनी पोलिसांकडून मोर्चाला कधीच परवानगी दिली जात नाही. आम्ही पालिका कार्यालयावर जाणारच आहोत. आम्हाला अडवलं तरी जाणार आहोत, असे महेश सावंत यांनी म्हटले.