Mumbai Metro: मुंबई मेट्रोची एक्वा लाइन म्हणजे यलो लाईन २बी मार्गासंदर्भात १६ एप्रिल महत्वाचा दिवस असणार आहे. मेट्रो लाईन २बी मार्गावर उद्यापासून चाचणी होणार आहे. भारतीय रेल्वेच्या १७२व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ट्रायल रन सुरू करण्यात येत आहे. या चाचणीनंतर डायमंड गार्डन (चेंबूर) ते मंडाले (मानखुर्द) या ५.४ किलोमीटर लांबीच्या मार्गावर लवकरच मेट्रो धावणार आहे. तसेच चेंबूर येथे मनोरेलसोबत मेट्रो जोडली जाणार आहे. या चाचणीनंतर सुरक्षा प्रमाणपत्र जारी केल्यावर हा मार्ग सुरु होणार आहे.
मेट्रोच्या मार्गावर डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल मेट्रो, मानखुर्द आणि मंडाले अशी पाच स्थानके आहे. पाच स्थानकांदरम्यान ताशी ८० किमीच्या वेगाने या गाडीची चाचणी घेतली जाणार आहे. चाचणीमध्ये रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग आणि ट्रॅकसह एकात्मता चाचणी होणार आहे. त्यानंतर लोडेड ट्रायल घेतली जाणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर मुंबईतील मेट्रोचा नवीन मार्ग सुरु होण्याचा मार्ग मोकळा आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या अंतिम मंजुरीनंतर प्रवाशांसाठी सेवा सुरू होणार आहे. तसेच चेंबूर येथे मोनोरेलशी जोडली जाणार असून प्रवाशांसाठी मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्टचा फायदा होणार आहे. तसेच मुंबईकरांना या भागातून उन्हाळ्यात मेट्रोतून गारेगार प्रवास करता येणार आहे.
मेट्रोच्या या प्रकल्पाचा एकूण खर्च १०,९८६ कोटी रुपये आहे. सुरुवातीला हा मार्ग २०१९ मध्ये पूर्ण होईल, असे नियोजन केले होते. परंतु या मार्गावरील तांत्रिक अडचणींमुळे मार्ग पूर्ण होण्यास विलंब झाला. आता मेट्रोचा हा संपूर्ण मार्ग डिसेंबर २०२५ पर्यंत खुला होण्याची शक्यता आहे.
मेट्रो ३ ची लवकरच सुरक्षा चाचणी
मुंबईतील ही पहिली भुयारी मेट्रो असलेल्या कुलाबा वांद्रे सीप्झ हा मेट्रो ३ संपूर्ण मार्ग ३३.५ किलो मीटरचा आहे. या मार्गाची पाहणीसुद्धा मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्या पथकाकडून झाली आहे. यामध्ये २७ भूमिगत स्टेशन आहेत. या मेट्रो प्रकल्पामुळे वांद्रे ते चर्चगेट दरम्यानची गर्दी कमी होईल. सध्या मेट्रोचा हा मार्ग काही प्रमाणात सुरु झाला. त्यावर प्रवाशांची गर्दी कमी आहे. परंतु संपूर्ण मार्ग सुरु झाल्यावर मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची गर्दी वाढणार आहे. या मार्गिकेचा पहिला टप्पा ७ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरु झाला होता.