केकवर लिहिली IPCची कलमंImage Credit source: TV9 Marathi
भांडूपमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका कुविख्यात गुंडाने त्याचा वाढदिवस भलत्याच पद्धतीने साजरा केला. या गुंडाने त्याच्या वाढदिवसाच्या केकवर गुन्ह्यांची कलमं लिहिली. त्यानंतर त्याने त्यावर प्रश्नचिन्ह दिलं. यानंतर त्याने एक वाक्य उच्चारलं. पुढील गुन्ह्याची प्रतिक्षा आहे, असं तो म्हणाल्याचा प्रत्यक्षदर्शीचा दावा आहे. या गुंडाच्या वाढदिवसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
झिया अन्सारी असं या कुविख्यात गुंडाचं नाव आहे. तो भांडुपमध्ये राहतो. त्याने त्याचा वाढदिवस अजबच प्रकारे साजरा केला. त्याने केलेल्या गुन्ह्याची कलमं या केकवर होती. एकप्रकारे गुन्ह्याचा गौरवच त्याने केला होता. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर काही तासातच, सोमवारी रात्री पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.
अन्सारीवर अनेक गुन्हे
अन्सारीवर अत्यंत गंभीर गुन्हे आहेत. त्यात खून (आयपीसी 302), खून करण्याचा प्रयत्न (आयपीसी 307), खंडणी (आयपीसी 387) आणि गंभीर हल्ला (आयपीसी 326) यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. अन्सारीने त्याच्या वाढदिवसाच्या केकवर ही अत्यंत गंभीर गुन्ह्यांची कलमं लिहिली होती. तसेच केकवर त्याने प्रश्नचिन्हही लिहिले होते. त्यातून संभाव्य गुन्हा केला जाणार असल्याचं सूचित केलं जात होतं. त्याच्या वाढदिवसाच्या केकचे हे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या दाव्यानुसार त्याने “पुढील केस का प्रतीक्षा है” (पुढील केसची वाट पाहत आहे) असं म्हटलं होतं. त्यामुळे पोलीस तो कोणता गुन्हा करणार? याची माहिती घेत आहेत. तर अन्सारीच्या या प्रकारामुळे पोलीस संतप्त झाले आहेत.
जामिनावर सुटला, आता तडीपार होणार?
अन्सारीवर 8 गंभीर गुन्हे आहेत. या गुन्ह्यांसाठी तो तुरुंगात होता. काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला आहे. जामिनावरून येताच त्याने परत हा कारनामा केला आहे. त्यामुळे पोलीस अलर्ट झाले आहेत. त्याने वाढदिवसाच्या केकवर 302,307, 387,326 ही कलमं लिहिली. त्यानंतर प्रश्नचिन्ह लिहिलं आहे. दोन दिवसांपूर्वीच त्याचा वाढदिवस झाला. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परिसरात दहशत माजवण्याचा त्याचा यातून प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, अन्सारीला तडीपार करण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसा प्रस्तावही पोलीस तयार करत असल्याचं सांगितलं जात आहे.