धाडस दाखवत काजोलने चोरट्याला पकडलंImage Credit source: TV9 Marathi
‘हिम्मत ए मर्दा मदद ए खुदा’… अशी एक म्हण आहे. जो माणूस किंवा जी व्यक्ती हिंमत दाखवतात, प्रयत्न करणं कधीच सोडत नाहीत, त्यांच्या मदतीसाठी खुद्द देव धावून येतो असा त्याचा अर्थ. हीच म्हण प्रत्यक्षात येताना दिसली ती पालघरच्या एक घटनेत. स्वतःच्या जीवाची बिलकूल पर्वा न करता घरात घुसलेल्या चोरट्यांशी भिडत त्यांच्यापैकी एकाला रोखून धरणाऱ्या काजोलची ही कहाणी. लाखोंचा ऐवज चोरण्यासाठी घरात घुसलेल्या चोरट्यांना पाहून सगळेच दचकले, पण काजोल डगमगली नाही, उलट तिने धाडस दाखवत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. दुसरा चोर जरी सोन्याचे दागिने घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरला असले तरी काजोलच्या शौर्यामुळे, धाडसामुळे एक चोरटा पकडला गेला आणि त्याच्याकडून चोरीचा लाखो रुपयांचा ऐवजही पुन्हा जप्त करण्यात आला. काजोलच्या या धाडसाचा सध्या सगळीकडे बोलबाला असून लोकं तिचं कौतुक करत आहेत.
नेमकं घडलं तरी काय ?
ही सगळी घटना आहे पालघरच्या आदर्श नगर परिसरातील काजोल चौहाने या महिलेची. तिने चोरट्याशी भिडत त्याला पकडण्याचं धाडसं दाखवलं. झालं असं की, काजोल काल संध्याकाळी तिच्या पतीसोबत केळवे येथे फिरायला गेली होती. रात्री 8 चत्या सुमारास ती परत आली तेव्हा तिच्या घरातक काही चोर शिरल्याचं लक्षात आलं. ते चोरी करून पळून जात असताना काजोल फ्लॅटच्या दरवाजा समोर पोहोचली आणि ती थेट त्या चोरट्यांशी भिडली.
एका हाताने बॅग तर दुसऱ्याने हाताने पकडली चोराची कॉलर
काजोलने एका चोरट्याची बॅग पकडून ठेवली असता चोराने तिला फरफटत नेले आणि तिच्यावर हल्लाही केला. मात्र काजोल घाबरली नाही आणि तिने एका हाताने त्या चोराची कॉलर पकडली आणि दुसऱ्या हाताने तिने आरोपीने घेतलेली बॅग पूर्ण ताकदीने पकडून ठेवली. त्यांचा आरडाओरडा एकून आजूबाजूचे लोक आणि काजोलचा पती धावून आले, आणि त्यांनीही त्या चोराला घेरत पकडलं आणि चांगलाच चोप दिला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करून त्या चोराला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं. मात्र या गडबडीत दुसरा चोर हा अंधाराचा फायदा घेऊन पळाला, त्याने 10-12 लाखांचे दागिने लांबवले. सोन्याचा ऐवज घेऊन तो पसार झालाय
काजोलच्या धाडसामुळे एक आरोपी पोलिसांना सापडला आहे तर दुसऱ्याचा शोध सध्या पोलीस प्रशासनाकडून घेतला जात आहे. दरम्यान काजोलने केलेल्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होते आहे. पोलिसांनी एक आरोपीला ताब्यात घेतले असून दुसऱ्या आरोपीचा तपास घेत आहे.