गर्भवती मृत्यू प्रकरणात आज ससूनचा अहवाल पुणे पोलिसांना मिळणार, आमदार अमित गोरखे मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिला तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाला होता. भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक असलेले सुशांत भिसे यांच्या त्या पत्नी होत्या. या प्रकरणात दीनानाथ रुग्णालय प्रशासनावर हलगर्जीपणा केल्याचा आरोप होत आहेत. यापूर्वी आलेल्या दोन्ही अहवालात रुग्णालयावर ठपकाही ठेवण्यात आला आहे. आता मंगळवारी ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना मिळणार आहे. तसेच या प्रकरणात आमदार अमित गोरखे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होत असून त्यातही तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात आलेल्या दोन अहवालांवर चर्चा होणार आहे.

आमदार गोरखे घेणार फडणवीस यांची भेट

आमदार अमित गोरखे यांनी तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात सांगितले की, भिसे कुटुंबाला नक्की न्याय मिळेल. या प्रकरणातील ससून रुग्णालयातील शासकीय डॉक्टर असलेल्या समितीचा अहवाल येणे बाकी आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज आपण भेटणार आहोत. त्यावेळी त्यांना डॉ.घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करावा, ही मागणी करणार आहोत.

कोणताही दबाव नसल्याचा गोरखे यांचा दावा

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात कुठलाही राजकीय दबाब नाही. सर्व चौकशी पारदर्शकपणे होत आहे. विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. परंतु न्याय मिळायला वेळ लागतो. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच तोडगा काढतील. या प्रकरणातील चौथ्या अंतिम अहवाल येणे बाकी आहे. या सर्व प्रकरणाचा निकाल भिसे कुटुंबाच्या बाजूने लागणार असल्याचे आमदार अमित गोरखे यांनी म्हटले.

ससूनच्या अहवालानंतर आज राज्य महिला आयोगाची बैठक होणार आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, तनिषा भिसे यांच्याबाबत जे घडले ते आता कधी घडू नये. आरोग्य सुविधा ही मुलभूत सुविधा आहे. आयएमएने आगाऊ रक्कम घेण्याबाबत जे म्हटले आहे त्याबद्दल आम्ही स्पष्टता मागू. तसेच संपूर्ण अहवाल आल्यानंतर आपण कारवाई करू, असे त्यांनी सांगितले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)