मोठी बातमी! बड्या पक्षानं सोडली एनडीएची साथ; केली मोठी घोषणा

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी (रालोजपा) चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांनी मोठी घोषणा केली आहे. पशुपती कुमार पारस यांनी आम्ही एनडीएमधून बाहेर पडत असल्याचं म्हटलं आहे. आता आमचा आणि एनडीएचा काहीही संबंध नाही,असं म्हणत त्यांनी नितिशकुमार सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. नितिशकुमार सरकार हे दलित विरोधी असल्याचं म्हटलं आहे. ते रालोजपाच्या वतीनं आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

पशुपती पारस यांनी सोमवारी मोठी घोषणा केली आहे, आता आमचा आणि एनडीएचा काहीही संबंध नाही. आजपासून आम्ही एनडीएसोबत असणार नाहीत. 2014 पासून आम्ही एनडीएचे विश्वासू मित्रपक्ष होतो. पण आता आम्हाला ही गोष्ट देखील लक्षात घ्यावी लागेल की, जेव्हा लोकसभा निवडणूक होते तेव्हा, आमचा दलित पक्ष असल्यानं आमच्यावर प्रत्येकवेळी अन्याय होतो. जर महाआघाडीने आम्हाला योग्य सन्मान दिला तर भविष्यातील राजकारणाबाबत विचार करू असंही ते यावेळी म्हटले आहेत.

स्वर्गीय रामविलास पासवान यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी देखील या कार्यक्रमामध्ये पशुपती कुमार पारस यांनी केली आहे. आमचा पक्ष लवकरच राज्यातील 243 मतदारसंघात सदस्य नोंदणी अभियान सुरू करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकार आणि बिहारमधील नितिशकुमार सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. हे दोन्ही सरकार भ्रष्ट असून दलित विरोधी आहेत.

मी आज अशी घोषणा करतो की, आजपासून आमचा आणि एनडीएचा कोणताही संबंध नाही, आम्ही राज्यातील सर्व 243 मतदारसंघात निवडणुकीची तयारी करणार आहोत. पक्षाचे कार्यकर्ते गावा-गावात जाऊन पक्ष संघटना मजबूत करणार आहेत. जो पक्ष आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये योग्य सन्मान देईल त्यांच्यासोबत आम्ही जाऊ, त्यासंदर्भात आम्ही पक्षाचे सर्व नेते एकत्र येऊन निर्णय घेऊ, कोणासोबत युती करायची हे अजून निश्चित झालं नाही, मात्र आम्ही स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, असं पशुपती कुमार पारस यांनी म्हटलं आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)