शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना देखील त्यांनी शिंदे यांचं नाव न घेता खोचक टोला लगावला आहे. मुंबईतील पाणी प्रश्नावर आज शिवसेना ठाकरे गटाची बैठक झाली, या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.
नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईमध्ये होते, त्यांची भेट एकनाथ शिंदेंनी घेतली. मात्र त्यांनी अमित शाहांकडे नाराजी व्यक्त केली आहे. अर्थ खातं आमच्या फाईलवर सही करत नाही, अशी तक्रार त्यांनी शाह यांच्याकडे केली, तसेच रायगडच्या पालकमंत्रिपदाचा मुद्दा देखील त्यांनी या भेटीवेळी उपस्थित केला अशी माहिती समोर येत आहे, असं यावेळी आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आलं. या भेटीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता खोचक टेला लगावला आहे. ‘ काल पौर्णिमा होती, काल काही लोक गावी पण जाऊन आले असतील, आणि मग ते ज्यांना भेटले त्यांनी थोडी काळजी घ्यावी, आमच्या अनुभवावरून सांगतो. बाकी काही नाही.’ असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आज आम्ही सगळे शिवसेनेचे जे मुंबईतील स्थानिक नेते आहोत, उपनेते आहेत, विभागप्रमुख, पदाधिकारी, महिलाआघाडी सर्वांची बैठक झाली. एकंदर आपण पाहात आहात गेल्या साहा-सात महिन्यांपासून मुंबईतील पाण्याच्या प्रश्नाबद्दल अनेकदा विषय घेतलेला आहे, मग कुठं गढूळ पाणी असेल, कुठं पाण्याचा दाब कमी असेल. आणि आता उन्हाळ्यात टँकर असोसियशनने संप पुकारला आहे. आता मुद्दा हा आहे की संपापूर्वी टँकर असोसियशनने नोटीस देऊन सुद्धा सरकार काही हलल नाही. मुंबईत महापालिकेतील जे प्रशासक आहेत, ते मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरच चालतात. मुंबईची एवढी आर्थिक हत्या होत आहे, तरी देखील मुख्यमंत्री लक्ष देत नाहीये, या पेक्षा अजून मोठं दुर्दैव कोणतं असेल?
मी या संपावर तोडगा काढण्यासाठी 48 तासांची डेडलाईन दिली होती, ती आता संपत आली आहे. या आठवड्यात प्रत्येक वार्डस् मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी वार्ड ऑफिसरवर मोर्चा काढून, पाण्यासंदर्भात प्रश्न विचारणार आहेत, असा इशाराही यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.