बांगलादेशातून भारतात घुसखोरी करून राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध एटीएस तसेच इतर यंत्रणा विविध मोहीम हाती घेत असतात. त्यातच न्यायालयाने जामीन दिल्यानंतरही मायदेशी परतण्याऐवजी काही बांगलादेशी मुंबई, महाराष्ट्रात वास्तव्य करून राहत असल्याची माहिती एटीएसला मिळाली. या माहितीची शहानिशा करण्यासाठी एटीएसच्या जुहू युनिटच्या पथकाने मुंबईच्या अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, माहुल गाव येथून चार बांगलादेशी नागरिकांची धरपकड केली. त्यांच्या चौकशीमध्ये आणखी काही बांगलादेशी असेच बेकायदा वास्तव्य करून राहत असल्याची माहिती मिळाल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
गुजरातच्या सुरत येथील वास्तव्याचे त्यांच्याकडे पुरावे सापडले. हे सर्व पुरावे आणि ओळखपत्रे त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बनविल्याचे उघडकीस आले आहे. न्यायालयाने या चौघांची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.
भारतीय पासपोर्टवर विदेशात नोकरी
बनावट भारतीय ओळख मिळवणाऱ्या या बांगलादेशींचे केवळ भारतातच वास्तव्य नसून ते या ओळखीचा वापर विदेशात नोकरीसाठीही करीत आहेत. अटक केलेल्या आणि चौकशीमध्ये रडारवर आलेल्या पाच बांगलादेशींनी बनावट कागदपत्रांवर भारतीय पासपोर्ट मिळवले आहेत. एक बांगलादेशी नागरिक तर या पासपोर्टवर सौदी अरेबियामध्ये जाऊन नोकरी करीत असल्याचे एटीएसने म्हटले आहे. भारतीय असल्याचे सिद्ध करण्यासाठी तसेच भारतीय पासपोर्टवर विदेशात नोकऱ्या मिळणे शक्य असल्याने ते भारतीय पासपोर्ट प्राप्त करतात, असे निदर्शनास आले आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
अटक केलेले बांगलादेशी
रियाज हुसेन शेख (३३). लोखंडवाला, अंधेरी
सुलतान सिद्दीक शेख (५४). मालवणी, मालाड
इब्राहिम शफिउल्ला शेख (४६). म्हाडा कॉलनी, माहुल गाव
फारूख उस्मानगणी शेख (३९) ओशिवरा, जोगेश्वरी (प.)