रायगडावर शिंदेंना भाषणाची संधी, अजितदादांना डावललं? अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

रायगड किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.  या कार्यक्रमात मोजकीच भाषणं असल्यामुळे या यादीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नावं नव्हती, मात्र ऐनवेळी एकनाथ शिंदे यांना संधी मिळाली तर अजित पवार यांचं भाषण झालं नाही, यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असतानाच आता यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?  

वेळ कमी होता, त्यामुळे मी काही भाषण केलं नाही, अशी प्रतिक्रिया यावर अजित पवार यांनी दिली आहे. दरम्यान अर्थ खात्याच्या फायली क्लिअर होत नाही, अशी तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे केली अशी माहिती समोर येत आहे. याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मला अमित शाह साहेब असं काहीही बोललेले नाहीत. हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा. या संदर्भात सकाळपासून ते अमित शाह मुंबईला निघेपर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. स्वत: देवेंद्र फडणवीस सोबत होते, एकनाथ शिंदे देखील सोबत होते.

एकनाथ शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले आहेत. त्याच्यामुळे ते तिकडे तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही. जर काही असेल तर ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील, मुख्यमंत्र्यांशी बोलतील. आम्ही वेगवेगळ्या महत्त्वाच्या निर्णयासंदर्भात एकत्र बसत असतो, बोलत असतो, चर्चा करतो, त्यातून मार्ग काढतो. दरम्यान यावेळी अजित पवार यांना रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत देखील प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले त्या बद्दल काही काळजी करण्याच कारण नाही. सगळं व्यवस्थित चाललं आहे. काळजी करण्याचं कारण नाही, त्यावर मार्ग निघेल, मार्ग निघाल्यावर तुम्हाला सांगितलं जाईल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)