Atul Save Vs Sanjay Shirsat : स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक कोणत्याही क्षणी लागू शकते. असे असतानाच आता स्थानिक पातळीवरील राजकारणाला वेग आला आहे. छत्रपती संभाजीनगरातही राजकीय मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. येथे पक्षबदल आणि नाराजीनाट्याच्या अनेक बातम्या येत आहेत. असे असतानाच आता याच संभाजीनगरातील भाजपाच्या आमदाराने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्याला कानपिचक्या दिल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरातील महानगपालिकेत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माजी मंत्री तथा भाजपाचे नेते अतुल सावे उपस्थित होते. मात्र शिवसेना पक्षाचे आमदार तथा मंत्री संजय शिरसाट यांना मात्र या कार्यक्रमाला यायला उशीर झाला. याच कारणामुळे अतुल सावे यांनी शिरसाट यांना कानपिचक्या दिल्याची चर्चा आहे.
अतुल सावे नेमकं काय म्हणाले?
अतुल सावे यांचा सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ते त्यांच्या कार्यकर्त्यांत तसेच पोलिसांच्या सुरक्षेत उपस्थित असल्याचे दिसत आहेत. याच व्हिडीओत ते संजय शिरसाट यांना बोलत होते. कार्यक्रमाला यायला शिरसाट यांना उशीर झाला होता. त्यानंतर सावे यांनी शिरसाट यांना कानपिचक्या दिल्या. ‘खैरे साहेब होऊ नका,’ असा दिलाही सावे यांनी शिरसाट यांना दिला.
आयुक्तांच्या फोनवरून शिरसाट यांना कॉल
सावे यांनी आयुक्तांच्या फोनवरून शिरसाट यांना फोन केला होता. त्यांच्या संभाषणात सावेंनी छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे नाव घेत शिरसाट यांना कानपिचक्या दिल्या आहेत.
चंद्रकांत खैरेंनी व्यक्त केली होती नाराजी
दरम्यान, काही दिवसांपूर्वी चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या पक्षाचे नेते तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. मला कोणत्याही कार्यक्रमात विचारले जात नाही. जिल्ह्यात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करायचे असेल तर माझ्याशी चर्चा केली जात नाही, अशी खंत खैरे यांनी व्यक्त केली होती. तर दुसरीकडे मी आठवड्यातून एकदा खैरे यांची भेट घेतो. माझ्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमातही मी खैरे यांना विचारले होते. स्वत: कारमध्ये त्यांना फिरवले होते. सर्व व्यवस्था दाखवली होती. त्यांना आणखी काय अपेक्षित आहे, हे मला माहिती नाही, असा प्रतिवाद दानवे यांनी केला होता.