अमित शाह यांच्या उपस्थितीत स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला गोगावलेंची दांडी, तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज रायगडच्या दौऱ्यावर आहेत.  छत्रपती शिवाजी महाराज यांची ३४५ वी पुण्यतिथी आणि शिवरायांच्या समाधीच्या नूतनीकरणाच्या शताब्दी सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त अमित शाह यांनी रायगड किल्ल्यावर हजेरी लावली.  यानंतर अमित शाह हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी जेवणासाठी देखील गेले. तटकरे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांना देखील निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. यावर आता तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले तटकरे? 

अमित शाह यांच्या भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. अतिशय मोकळ्या पद्धतीनं खेळीमेळीच्या वातावरणात संवाद झाला. जेवण हे अतिशय साध्या पद्धतीचं महाराष्ट्रीयन जेवन होतं. आमच्या विनंतीला मान देऊन शाह हे घरी आले,  शाह यांच्या उपस्थितीमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. पालकमंत्रिपदावर यावेळी कोणतीही चर्चा झाली नाही. शाह यांच्या उपस्थितीमध्ये कौटुंबीक चर्चा झाली.

माझं कर्तव्य होतं, मी भरतशेट गोगावले, उदय सामंत या सर्वांनाच निमंत्रित केलं होतं. पण गोगावले आले नाहीत. ते का आले नाहीत हे मला माहीत नाही.  पण मी माझं कर्तव्य केलं. राजकारणाच्या पलीकडे आणि एका विशिष्ट बाबींच्या पलीकडे सुद्धा सार्वजनिक जीवनामध्ये परस्परांचे संबंध राहिले पाहिजेत. स्वर्गिय चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये जी संस्कृती रूजवली आहे, ते संस्कार आमच्या सर्वांवर झाले आहेत. बाकी त्याबद्दल मी आणखी काही बोलणार नाही, असं त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये, त्यामुळे भरत गोगावले नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

दरम्यान विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. याबाबत देखील यावेळी तटकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना जेव्हा यश मिळालं तेव्हा देखील ईव्हीएमवरच मतदान झालं होतं.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)