Sharad Pawar: निवडणूक झाली, लोकांनी काय निकाल द्यायचा तो दिला, आता…; शरद पवारांची बारामतीसाठी मोठी घोषणा

बारामती(दीपक पडकर): निवडणूक झाली. लोकांनी काय निकाल द्यायचा तो दिला. आता जबाबदारी कामाची आहे. बारामतीसह जिल्ह्यातील अन्य एमआयडीसींमध्ये मोठे उद्योग लवकरच आणले जातील, त्यासाठी केंद्र व राज्याची मदत घेतली जाईल, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी दिली. बारामतीत आयोजित व्यापारी मेळाव्यात ते बोलत होते.

पवार म्हणाले, एका साखर कारखान्याच्या भूमीपूजनाला मी गेल्यावर पुण्यात आयटी पार्क उभारण्याची कल्पना पुढे आली. हिंजवडीत आयटी पार्क उभे राहिले. तेथे आता ३ लाख लोकांना रोजगार मिळतो आहे. ११ हजार कोटींची उलाढाल होत आहे. यापुढील काळातही बारामतीसह जिल्ह्यात मोठे उद्योग आणत हातांना काम दिले जाईल. त्या माध्यमातून व्यापारी पेठेला गती येईल. मला यात राजकारण आणायचे नाही. अर्थकारण कसे मजबूत होईल ते मी बघणार आहे. त्यासाठी माझ्याकडे स्वतंत्र प्लॅन तयार आहे. केंद्र व राज्याची मदत घेतली जाईल. संघर्ष, टीका हे निवडणूकीपुरते असते. परंतु अर्थकारण वाढविण्यासाठी मदत घेण्याची वेळ आली तर मला त्यात कमीपणा नाही.
Legislative Council Elections: परिषदेवरुन आघाडीत बिघाडी; उद्धव ठाकरे फोन उचलत नसल्याचा नाना पटोलेंचा आरोप, नाशिकच्या जागेवरुन वादाची शक्यता
दुष्काळी दौऱ्यासाठी मी जेव्हा निघतो तेव्हा नेमका पाऊस सुरु होतो, असे सांगून पवार म्हणाले, माझ्या दौऱ्यात अडथळा आला तरी चालेल पण पाऊस झाला पाहिजे. हवामान अभ्यासकांच्या मते यंदाचे वर्ष चांगल्या पावसाचे आहे. देशात ऊस ऊत्पादनात यापूर्वी उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर होते. यंदा महाराष्ट्राने हे स्थान मिळविले. पण टनेज घटले. त्याचा परिणाम दिसून आला. असे चढउतार होत असतात. पण अशा स्थितीत राज्यकर्त्यांनी शहाणपणाने निर्णय घ्यायचे असतात. दुदैवाने केंद्राने याच काळात निर्यातबंदी केली.


परिणामी राज्यात साठा असताना आणि जागतिक बाजारात मागणी आणि चांगले दर असताना त्याचा फायदा घेता आला नाही. आम्ही केंद्राकडे मागणी केली तर निवडणूकीपर्यंत ऐकणार नाही, असे उत्तर मिळाले. कारखाने आता ऊसापासून वीज, इथेनाॅल तयार करू लागले आहेत. पण केंद्राने इथेनाॅल बंदी केली. परिणामी कारखानदारीपुढील अडचणी वाढल्या, असे शरद पवार म्हणाले.