भाजप नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतील तेव्हा हॉटेलमध्ये कोंबडी वडे आणि मासे ठेवू नका असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले नारायण राणे?
नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतील तेव्हा हॉटेलमध्ये कोंबडी वडे आणि मासे बंद ठेवा, असं आपण हॉटेल व्यवसायिकांना सांगितल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी कोकणाला काय दिले? केवळ मासे, मटण खाण्यासाठीच ते कोकणात यायचे, त्यामुळेच ते उद्धव ठाकरे आले की हॉटेलमध्ये कोंबडी वडे आणि मासे ठेवायचे नाहीत, असं मी हॉटेल व्यावसायिकांना सांगितल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना त्यांनी चिपी विमानतळावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. चिपीला आता इंडिगो विमान पण येणार आहेत, आता चिपी विमानतळ बंद होणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विमान देशात वेगवेगळ्या ठिकाणी जाईल, यासाठी माझा प्रयत्न आहे. लोकांनी प्रवास करावा, उद्योगधंदे वाढावेत यासाठी माझा प्रयत्न असल्याचंही खासदार नारायण राणे यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान यापूर्वी देखील अनेकदा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दिशा सालियन प्रकरणात देखील त्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. या प्रकरणात मला उद्धव ठाकरे यांचे दोन फोन आल्याचा दावा राणे यांनी केला होता, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून राणेंचा हा दावा फेटाळून लावण्यात आला होता. राणेंना जेव्हा अटक झाली तेव्हा उद्धव ठाकरेंना फोन आला होता, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. आता पुन्हा एकदा राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.