पुनर्विकसित कामाठी पुराला ‘नामदेव ढसाळ नगर’ नाव देऊ या, सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांची घोषणा

ज्या कामाठी पुरातील व्यथा आणि वेदना कवी नामदेव ढसाळ यांनी मांडल्या त्या कामाठी पुराच्या पुनर्विकास प्रस्तावित आहे. ज्यावेळी ही एक नवी मुंबई या भागात उभी राहिल, तेव्हा या भागाला ‘महान कवी नामदेव ढसाळ नगर’ असे यांचे नाव दिले पाहिजे, त्यासाठी आपण सगळ्यांनी पाठपुरावा करू या, अशी कल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी आज येथे मांडली. कवी नामदेव ढसाळ यांच्या 76 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भायखळा येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात “सारे काही समष्टीसाठी” या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचे उद्घाटन आज सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

ज्यांनी समष्टीचा मुळ विचार मांडला त्या नामदेव ढसाळ यांच्या आणि माझ्या जगण्यात काही साम्यस्थळे आहेत. त्यामुळे मी नामदेव ढसाळ यांना अभिवादन करण्यासाठी आलो आहे असे सांगत सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी गिरणगावातील आपल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ते पुढे म्हणाले की,” गिरणगावातील माझ्या बालपणाच्या आठवणींसोबत नामदेव ढसाळ यांची लेखणी जोडलेली आहे.

अंत्योदयाच्या विचाराशीही हे तत्त्व एकरूप

शिक्षणाच्या प्रमाणपत्रांपेक्षा अनुभवाची आणि वेदनेची विद्यापीठे त्यांच्याकडे होती. त्यांचे लेखन म्हणजे ज्वालामुखीतून बाहेर पडणारी अस्सल शक्ती होती. त्यांचे लिखाण हे रेषा, व्याकरण आणि परंपरागत चौकटी मोडणारे होते. ढसाळ यांनी मराठी साहित्यात नवीन प्रमेय मांडले त्यामुळे ढसाळ मराठी साहित्यातील “पायथागोरस” होते. नामदेव ढसाळ यांचे संपूर्ण आयुष्य ही समष्टीची लढाई होती. कुठलीही तडजोड न करता, निर्भयपणे विचार मांडणारे ते व्यक्तिमत्त्व होते. पंडित दिनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या ‘व्यक्ती ते समष्टी, व्यक्ती ते प्रकृती’ या अंत्योदयाच्या विचाराशीही हे तत्त्व एकरूप आहे.” असेही त्यांनी नमूद केले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)