तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या विकासामुळे अनेक नवीन शक्यता समोर येत आहेत. विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे क्षेत्र इतक्या वेगाने प्रगत होत आहे की, त्याचा उपयोग आता केवळ उद्योग, शिक्षण किंवा सर्जनशील कामापुरता मर्यादित राहिलेला नाही. अलीकडे AI च्या साहाय्याने तयार करण्यात आलेल्या बनावट आधार कार्डाच्या प्रकरणाने सायबर सुरक्षेच्या दृष्टीने एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. एका LinkedIn युजरने ChatGPT चा वापर करून हे प्रयोग करताच समोर आलेल्या निष्कर्षांमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही घटना दाखवते की, AI चा गैरवापर होऊ लागल्यास तो आपल्या दैनंदिन सुरक्षेवर आणि गोपनीयतेवर थेट परिणाम करू शकतो.
आधार कार्ड भारतातील प्रत्येक नागरिकाची ओळख सिद्ध करणारा १२ अंकी युनिक ओळख क्रमांक ही एक महत्त्वाची ओळख आहे. ही ओळख बायोमेट्रिक व डेमोग्राफिक डेटावर आधारित असते. सरकारच्या योजनांपासून ते बँक खात्यांपर्यंत अनेक सेवा यावर आधारित असतात. पण जर हीच ओळख बनावट करता आली, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
AI च्या मदतीने तयार झालेल्या बनावट आधार कार्डात अनेक गोष्टी वेगळ्या असतात जसे की फोटोमध्ये अस्पष्टता, फॉन्टचा संरेखन वेगळं असणं, विशेष चिन्हांचा चुकीचा वापर, तसेच लोगोच्या गुणवत्तेमध्ये फरक. हे सगळे संकेत आपल्याला सांगतात की कार्ड बनावट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशी कोणतीही शंका आल्यास लगेच UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन (https://myaadhaar.uidai.gov.in/verifyAadhaar) आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकून पडताळणी करणं आवश्यक ठरतं.
अस्सल आणि बनावट आधार कार्ड वेगळं ओळखण्याचा सर्वात सोपा आणि खात्रीशीर मार्ग म्हणजे QR कोड स्कॅन करणे. खऱ्या कार्डाचा QR कोड स्कॅन केल्यावर UIDAI डेटाबेसशी जुळणारी माहिती मिळते. ज्यात नाव, राज्य व लिंग यांचा समावेश असतो. बनावट QR कोड स्कॅन केल्यावर त्रुटी दाखवली जाते किंवा चुकीची माहिती दिसते.
तुमच्या डिजिटल सुरक्षेसाठी UIDAI ने दिलेली ‘Virtual ID’ (VID) सुविधा ही अतिशय उपयुक्त आहे. ही १६ अंकी तात्पुरती ओळख केवळ आधारधारक स्वतः तयार करू शकतो. ती कुठल्याही इतर अॅप किंवा संस्थेमार्फत तयार होऊ शकत नाही. एकदा VID तयार झाल्यावर ती थेट रजिस्टर्ड मोबाइलवर SMS द्वारे पाठवली जाते. यामुळे तुमचा मूळ आधार क्रमांक सुरक्षित राहतो.