देशभरात तापमान वाढू लागल्याने घराघरात एसी सुरू होऊ लागले आहेत. मात्र, अनेक वेळा हजारो रुपये खर्च करून एसी घेतल्यावरसुद्धा खोली नीट थंड होत नाही. यामागचं मोठं कारण म्हणजे – चुकीचं इंस्टॉलेशन! योग्य उंची, योग्य अँगल आणि काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार न केल्यास एसीची कूलिंग क्षमताच कमी होते. परिणामी, वीजबिल वाढतं, पण थंडी मिळत नाही. जाणून घ्या, एसी लावताना कोणत्या गोष्टींची घ्यावी विशेष काळजी.
1. योग्य उंचीवरच एसी लावा
तुमच्या खोलीत स्प्लिट एसी लावत असाल, तर तो जमिनीपासून ७ ते ८ फूट उंचीवर बसवणं सर्वात योग्य. ही उंची एसीच्या थंड हवेचं योग्य वितरण करतं आणि खोली लवकर गार होते.
छत अगदी कमी किंवा खूप उंच असेल, तर तदनुसार थोडा बदल करता येईल. पण एक गोष्ट नक्की – एसी कधीही छताला चिकटवून लावू नका. त्यामुळे थंडी नीट खोलीत फिरत नाही.
2. थोडासा झुकाव गरजेचा
एसी बसवताना थोडकासा खाली झुकाव ठेवा. त्यामुळे यंत्रातून बाहेर येणारं पाणी व्यवस्थित वाहून जातं. झुकाव नसेल, तर पाणी गळण्याचा त्रास होऊ शकतो.
3. वर्षभर बंद ठेवलेला एसी? मग आधी सर्व्हिस करून घ्या!
एसी अनेक महिने वापरात नसेल, तर तो सुरू करण्याआधी एकदातरी अनुभवी टेक्निशियनकडून त्याची सर्व्हिस करून घ्या. गॅस लीक किंवा धूळमातीमुळे एसी योग्य काम करणार नाही.
4. स्टेबलायझर वापरणं गरजेचं
जर तुमच्या भागात वीजेचा व्होल्टेज कमी-जास्त होत असेल, तर चांगल्या दर्जाचा स्टेबलायझर लावा. यामुळे एसीचं यंत्र सुरक्षित राहील आणि आगीचा धोका टळेल.
5. अग्निकांडाची शक्यता टाळा
उन्हाळ्यात एसीमध्ये आग लागण्याच्या घटना वाढतात. बहुतांश वेळा यामागे चुकीचा वापर, जास्त लोड किंवा वेळेवर सर्व्हिस न करणं कारणीभूत ठरतं.
एसी फक्त आरामासाठी नसतो, तर तो योग्य पद्धतीने वापरला तर वीजेची बचत आणि सुरक्षिततेचं साधनही ठरतो. म्हणून यंदाच्या उन्हाळ्यात एसी लावताना या टिप्स नक्की पाळा!