‘बिहार निवडणुकीदरम्यान दहशतवादी तहव्वूर राणाला फाशी…’, संजय राऊतांचा दावा काय?

संजय राऊतांचा घणाघातImage Credit source: टीव्ही ९ मराठी

26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा याला भारतात आणण्यात आले आहे. तहव्वूर हुसैन राणा याला तात्काळ फासी देण्याची मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणाला ऐन बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळात फासी देण्यात येणार असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली. देशातील बँकांना गंडा घालणाऱ्या नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांचे लवकर प्रत्यार्पण करण्याची मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली. त्यांनी माजी नौदल अधिकारी आणि भारतीय व्यापारी कुलभूषण जाधव यांचे प्रत्यार्पण करण्याची मागणी केली.

राणाला फाशी द्या

दहशतवादी तहव्वूर राणा याला लागलीच फाशी दिली पाहिजे, असे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले. पण त्याला बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळात फाशी देण्यात येईल असे ते म्हणाले. बिहार निवडणुका या वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. राणाला भारतात आणण्यासाठी 16 वर्षांपासून लढा सुरू आहे. काँग्रेसच्या शासन काळात ही प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे राणा याला भारतात आणण्याचे श्रेय कोणीही घेऊ नये असे राऊत म्हणाले. तहव्वूर राणा हा प्रत्यार्पण होणारा काही पहिला नाही, यापूर्वी 1993 मधील बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेम याला सुद्धा प्रत्यार्पण प्रक्रियेतंर्गत भारतात आणण्यात आले होते.

कुलभूषण जाधव यांना परत आणा

कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणावे अशी मागणी त्यांनी केली. 2016 मध्ये त्यांना धोक्याने पकडून पाकिस्तानात आणण्यात आले होते. त्यांच्यावर हेरगिरी केल्याचा कथित आरोप करत पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. भारताने पाकिस्तानचे हे सर्व आरोप फेटाळले आहेत. याप्रकरणी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितलेली आहे. कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण करून पाकिस्तानात आणले होते. यामागे पाकिस्तानचे भारताला बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र होते.  आता जाधव यांना भारतात परत आणण्याची मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यांनी राणाला परत आणण्याचे कोणीही राजकारण करून त्याचे श्रेय लाटू नये असा टोला लगावला.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)