आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीवरुन महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक आणि कोकण या मतदारसंघासाठी काँग्रेस इच्छुक असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने याठिकाणी उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. या जागा एकत्रित लढण्याचा काँग्रेसचा विचार असून यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण अद्याप चर्चा झाली नसल्याचा दावा केल्याने आघाडीतील बिघाडीच्या चर्चेला उधाण आले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी टिळक भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील आरोप केला आहे. यावेळी नाना पटोले म्हणाले की, विधान परिषदेच्या चार जागांची निवडणूक एकत्र लढवण्याचा महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसचा विचार आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केला परंतु संपर्क होऊ शकला नाही. अर्ज मागे घेण्यास अजून वेळ असून लवकरच यावर निर्णय होईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तर विधान परिषदेच्या कोकण पदवीधर व नाशिकच्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने जाहीर केली होती. परंतु शिवसेनेने परस्पर कोकण, नाशिक व मुंबई मतदार संघासाठीचे उमेदवार जाहीर केले. विधान परिषद निवडणुकीचा निर्णय एकत्र बसून केल्यास महाविकास आघाडीला लोकसभेप्रमाणे चांगले यश मिळू शकेल, यासाठी काँग्रेसचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे यांना संपर्क केला तेव्हा ते परदेशात होते. आज मातोश्रीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही. अजूनही वेळ गेलेली नाही, चर्चेतून मार्ग निघू शकतो, असेही नाना पटोले म्हणाले.
भाजपाला आता आरएसएसची गरज नाही…
सरसंघचालक मोहन भागवत यांनी सरकारला दिलेल्या सल्ल्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाही असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे मोहन भागवत यांनी भाजपा सरकारला काहीही सल्ला दिला तरी ते सरकार मानेल असे वाटत नाही, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.