कल्याणमध्ये ‘दिनानाथ’च्या घटनेची पुनरावृत्ती?, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

कल्याणमध्ये ‘दिनानाथ’च्या घटनेची पुनरावृत्ती?

पुण्यातील दिनानथ मंगेशकर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप होत आहे. हे प्रकरण ताजे असतानाच, आता असाच काहीसा प्रकार कल्याणमध्येही घडल्याचे समोर येत आहे.
कल्याण पूर्वेतील शक्तीधाम प्रसूतीगृहात उपचारादरम्यान गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. शांतीदेवी अखिलेश मौर्य असे मृत महिलेचे नाव आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पूर्वेतील शक्तीधाम प्रसूतीगृहात शांतीदेवी अखिलेश मौर्य या महिलेला गर्भपात आणि कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. तिची शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच तिची प्रकृती खालावली, तिला इंजेक्शन दिले गेले. मात्र तिला प्रसूतीगृहातून खाजगी रुग्णालयात नेत असताना तिचा वाटेत मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूस प्रसूतीगृहातील डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप महिलेच्या पतीसह तिच्या कुटुंबियांनी केला आहे.

पत्नीच्या मृत्यूस प्रसूतीगृहातील डॉक्टर जबाबदार, पतीचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात राहणारी शांती देवी अखिलेश मौर्य ही महिला दोन महिन्याची गर्भवती होती. तिला या आधी तीन मुले आहेत. तिच्या पतीने तिचा गर्भपात आणि कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी महापालिकेच्या शक्तीधाम प्रसूतीगृहात 4 एप्रिल रोजी दाखल केले होते. तिचा दुपारी चार वाजता मृत्यू झाला. आपल्या पत्नीच्या मृत्यूस प्रसूतीगृहातील डॉक्टर जबाबदार आहे,असा आरोप तिचा पती अखिलेश यांनी केला आहे.

माझ्या पत्नीला स्टोनचाही त्रास होता. ती गुटखा खात होती, तिचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांना याबाबत जाब विचारला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. तिचा मृत्यू गुटखा खात असल्याने झाल्याचे उत्तर दिले आहे. मात्र महिलेच्या पतीने केलेले आरोप डॉक्टरांनी फेटाळून लावले आहे. धक्कादायक म्हणजे प्रसूती गृह असलेल्या या रुग्णालयात आयसीयू देखील नसल्याचे समोर आले आहे.

केडीएमसीच्या आरोग्य विभागाचे अधिकारी दीपा शुक्ला यांच्या सांगण्यानुसार, ही महिला सात तारखेला रुग्णालय दाखल झाली होती. तिला भूल दिली होती, मात्र त्यानंतर तिला त्रास व्हायला लागला. डॉक्टर विचार सुरु केले होते. पुढच्या सुरू असताना तिला खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं व त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला, असे त्यांनी सांगितलं. आशा वर्कर कडून सर्वे केला जातो, त्यावेळेला सदर महिलेला तीन मुलं आहेत आणि ही पाचवी वेळ होती, त्यांना मुल नको होतं अशी माहिती कळली. त्यामुळे ती रुग्णालयात दाखल झाली होती. आयसीयूची सुविधा या हॉस्पिटलमध्ये नाही.

कल्याण डोंबिवली मध्ये तीन मॅटर्निटी हॉस्पिटल्स आहेत, मात्र तिथे आयसीयूची सुविधा नाही . लहान मुलांसाठी एनआयसीयूची सुविधा आहे आपल्याला महिला क्रिटिकल वाटली तर जवळच्या रुग्णालयात किंवा आपले रिप्लेस देऊन शासकीय रुग्णालयामध्ये पाठवले जाते असे मत त्यांनी मांडलं.

दरम्यान दोन महिन्यापूर्वी महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात सुवर्णा सरोदे या गरोदर महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात दोन डॉक्टरांना महापालिकेने सेवेतून कमी करीत त्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या महिनाभरातच ही दुसरी घटना घडल्याने महापालिकेचे आरोग्य सेवाही व्हेंटिलेटर वर असल्याचे दिसून येतंय.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)