आमदार निवासातून रुग्णवाहिकेला वारंवार फोन, पण अ‍ॅम्बुलन्स न आल्याने व्यक्तीचा मृत्यू

आमदार निवासातून फोन केल्यावर रुग्णवाहिका आली नाही

राज्याचा आरोग्य विभागाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातून चालतो त्याच्याजवळ असणाऱ्या आमदार निवासातही वैद्यकीय सुविधा मिळत नाही. मुंबईसारखा राजधानीच्या ठिकाणावरुन, तेही आमदार निवासातून फोन केल्यावरसुद्धा रुग्णावाहिका आलीच नाही. त्यावेळी व्यक्तीला ह्रदयविकाराच्या तीव्र वेदना होत होत्या. परंतु वेळेवर उपचार मिळाले नाही. त्यामुळे आमदार निवासात राहणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

अनेक फोन केल्यावर रुग्णावाहिका आली नाही

राज्यात सध्या पुणे येथील दीनानाथ रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलाचा मृत्यू झाल्याचा प्रकार गाजत आहे. त्यानंतर आता मंत्रालय शेजारी असणाऱ्या आमदार निवासातून फोन गेल्यावरसुद्धा रुग्णवाहिका मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आकाशवाणी येथील आमदार निवासात ४०८ क्रमांकाची खोली आमदार विजयकुमार देशमुख यांना दिली आहे. त्यांच्या खोलीत सोलापूरमधील चंद्रकांत धोत्रे राहत होते. त्यांना रात्री १२.३० वाजता ह्रदयविकारच्या वेदना सुरु झाल्या. त्यामुळे रुग्णावाहिकेला वारंवार फोन करण्यात आले. त्यानंतरही रुग्णवाहिका आली नाही. शेवटी पोलिसांना फोन करावा लागला. पोलिसांच्या गाडीतून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आमदार देशमुख यांचे कार्यकर्ते

आमदार विजयकुमार देशमुख यांचे कार्यकर्ते असलेले विशाल धोत्रे यांचे चंद्राकांत धोत्रे वडील होते. ते एका बैठकीसाठी मुंबईत आले होते. ते आकाशवाणी आमदार निवासात थांबले होते. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णवाहिकेला फोन केले गेले. परंतु रुग्णवाहिका आली नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे.

राज्यात मुंबईसारख्या ठिकाणी रुग्णावाहिका वेळेवर येत नाही. मग ग्रामीण भागात काय परिस्थिती असणार? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. या प्रकरणी धोत्रे कुटुंबियाकडून कोणतीही तक्रार दिली नाही. त्यांचा मृतदेह घेऊन कुटुंबीय गावी निघाले आहेत. या प्रकारानंतर राज्यातील आरोग्य व्यवस्थेची बिकट परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)