दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण; डिपॉझिटच्या प्रश्नावर डॉ. केळकरांचं अजब उत्तर, म्हणाले…

पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसुतीसाठी आलेल्या महिलेच्या कुटुंबाकडे तब्बल दहा लाखांचं डिपॉझिट मागण्यात आलं. या महिलेच्या कुटुंबानं अडीच लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली होती, मात्र तरी देखील या महिलेला रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं नाही. योग्यवेळी उपचार न मिळाल्यानं या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबानं केला आहे. त्यानंतर राज्यात आता वातावरण चांगलंच तापलं आहे. शासनाच्या अहवालामध्ये देखील रुग्णालयावरच ठपका ठेवण्यात आला आहे. या सर्व प्रकारानंतर आता डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा रुग्णालयाचे संचालक डॉ. धनंजय केळकर यांच्याकडे सुपूर्द केला. डॉ. सुश्रुत घैसास यांच्या राजीनाम्यानंतर डॉ. धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

नेमकं काय म्हणाले केळकर? 

डॉक्टरांनी डिपॉझिट मागण्याची पद्धत आमच्या हॉस्पिटलमध्ये नाहीये, मात्र डॉक्टरांच्या डोक्यात काय आलं, त्यांनी दहा लाख रुपये डिपॉझिट नमूद केले, असं अजब उत्तर डिपॉझिटच्या प्रश्नावर डॉ. केळकर यांनी दिलं आहे.

मला या महिलेच्या कुटुंबाचा फोन आला, त्यांनी मला सांगितलं की सर मला ते एवढी रक्कम मागत आहेत.  माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. मग मी त्यांना म्हणालो तुमच्याकडे किती रक्कम आहे, त्यांनी मला सांगितलं की मी दोन अडीच लाख रुपये भरू शकतो. म्हणलं तुम्ही तेवढी रक्कम भरा, बाकीच्या सूचना मी त्यांना देतो. मी सांगितलेल्या गोष्टींना ते नाही म्हणणार नाहीत.

मी इथे दररोज दहा शस्त्रिक्रिया करतो, माझ्या आयुष्यात मी किती शस्त्रक्रिया केल्या असतील पण मी असं काहीही कोणालाही लिहून दिलेलं नाही. पण त्या लोकांनी काय लिहून दिलं असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता. जर कोणाला डिपॉझिट घ्यायचं असेल तर ते बिलिंग डिपार्टमेंटला डॉक्टरांशी बोलून समजून घेऊन त्या रकमेपैकी किती रक्कम घ्यायची हे ठरवलं जातं.  मात्र हे काही सिलेक्टेड केसेसमध्येच होतं. या केसेमध्ये तशाप्रकारचं डिपॉझिट डॉक्टरांशी बोलून त्यांनी रुग्णाला सांगितलं, असा खुलासा यावेळी केळकर यांनी केला आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)