कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे आज नंदुरबार दौऱ्यावर आहेत. अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरवला आहे. पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा पाहाणी दौरा कृषीमंत्र्यांकडून सुरू आहे. दरम्यान नंदुरबार दौऱ्यावर असताना सरकारची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत माणिकराव कोकाटे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडला आहे, मात्र त्यामुळे बाकीच्या योजना बंदी पडतील असं काही होणार नाही, असं कोकाटे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सरकार सर्वांना बरोबरीनं घेऊन चाललं आहे. सर्वांना न्याय देणार आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालं, मात्र अजूनही आकडेवारी आलेली नाहीये. राज्यातील नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे लवकरच पूर्ण होतील. पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार आहे, यावेळी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी उशीर होणार नाही, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षांकडे कमी आमदार असल्यामुळे त्यांना विरोधी पक्ष नेताही नेमता येत नाहीये. भविष्यातील काळ हा विरोधकांसाठी अवघड आहे, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. दरम्यान वक्फ सुधारना विधेयकाला लोकसभा आणि त्यानंतर राज्यसभेत मंजुरी मिळाली आहे. मात्र त्यानंतर विरोधकांकडून आता सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. मुस्लिमांच्या जमिनीनंतर आता ख्रिश्चनांच्या जमिनीवर सरकारचं लक्ष असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
विरोधकांच्या या टीकेला देखील यावेळी माणिकराव कोकाटे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधी पक्षांच्या लोकांकडे काही काम उरलेलं नाही, त्यामुळे ते मुस्लिम आणि ख्रिश्चनांच्या जमिनीचा विषय काढत आहेत. दोन जातींमध्ये भांडण लावण्याचं काम विरोधक करत आहेत, असं यावेळी माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.