वक्फवरून INDIA आघाडीत मतभेद ? संजय राऊत म्हणाले; आमच्यासाठी ही फाईल बंद

बहुचर्चित वक्फ बिलाला समर्थन द्यायचं की विरोध करायचा यावून इंडिया आघाडीतील पक्षांमध्येच एकमत नाहीये. संसदेने संमत केलेल्या विधेयकाला घटनाबाह्य ठरवत एकीकडे काँग्रेस आणि द्रमुकने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असताना आता इंडिया आघाडीतील पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनने मात्र या विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार नसल्याचे म्हटले आहे. मात्र, लोकसभा आणि राज्यसभेत या विधेयकाला ठाकरेंच्या शिवसेनेने कडाडून विरोध केला. मात्र आता ही फाईल बंद केल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.

बिहारमधील किशनगंजमधील काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद यांनी वक्फ (दुरुस्ती) विधेयकाच्या घटनात्मकतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या विधेयकासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचे (जेपीसी) ते सदस्यही होते. याबाबत शिवसेना-ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा ‘आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार नाही. आम्ही आमचे काम केले आहे. जे काही बोलायचे होते ते संसदेच्या दोन्ही सभागृहात झाले. ही फाईल आता आमच्यासाठी बंद आहे.’ असे राऊत यांनी नमूद केलं.

वक्फ विधेयक उद्योगपतींच्या फायद्याचे

वक्फ बिलावरून संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना हा उद्योगपतींच्या फायद्यासाठी तयार केलेला अजेंडा असल्याचेही म्हटले. ‘वक्फ विधेयकाचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही. हे एक सामान्य विधेयक आहे. जर कोणी याचा संबंध हिंदुत्वाशी जोडत असेल तर तो मूर्ख आहे. या विधेयकाशी काही संबंध असल्यास भविष्यात काही उद्योगपतींना वक्फ बोर्डाच्या मालमत्ता ताब्यात घेणे सोपे व्हावे हा त्याचा स्पष्ट उद्देश आहे.’ असे म्हणत राऊत यांनी त्यांची भूमिका मांडली.

वक्फ (दुरुस्ती) विधेयकाला लोकसभा आणि राज्यसभेची मंजुरी मिळाली असून ते राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे. राष्ट्रपतींची संमती मिळाल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होणार असून केंद्र सरकारकडून गॅझेट अधिसूचना जारी झाल्यानंतर ते संपूर्ण देशात लागू होणार आहे. लोकसभेत वक्फ विधेयकाच्या समर्थनार्थ 288 मतं होती, तर विरोधात 232 मते पडली. त्याचवेळी, राज्यसभेत या विधेयकाच्या समर्थनार्थ 128 मते पडली, तर विरोधात 95 मते पडली. राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही राज्यसभेत वक्फ विधेयकाविरोधात बोलल्याबद्दल शिवसेना-यूबीटी खासदार संजय राऊत यांची खरडपट्टी काढली होती.

प्रफुल पटेल यांचा राऊतांवर निशाणा

प्रफुल्ल पटेल वक्फ विधेयकावर राज्यसभेत भाषण करत होते, तेव्हा संजय राऊत सभागृहात नव्हते. शिवसेना-यूबीटीच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांना राष्ट्रवादीच्या खासदाराबद्दल काही बोलायचे होते तेव्हा पटेल म्हणाले – यूबीटी, तुम्ही दुसऱ्या पक्षात आहात म्हणून बोलू नका. तोपर्यंत संजय राऊत सभागृहात आले होते. ते आत येताच प्रफुल्ल पटेल यांनी बाबरी मशीद आणि मुंबई बाँबस्फोटांचा उल्लेख राऊतांवर निशाणा साधला. त्यानंतर संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी पटेल यांच्यावर पलटवार केला. राऊत म्हणाले की, प्रफुल्ल पटेल यांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढू नये. त्यांनी वडीलांसमान असलेल्या शरद पवार यांच्यावर वार केला आणि ते पळून गेले आणि आता निष्ठेबद्दल बोलत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)