काय घडलं?
या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांभुळवाडी परिसरात राहणाऱ्या मयूरचे लग्न झाले होते. नऱ्हे येथील गावगाडा हॉटेलशेजारील इमारतीत चौथ्या मजल्यावर त्याचे ऑफिस होते. तो सदनिका खरेदी-विक्री करीत होता; यासह जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहारही करीत असे. रविवारी रात्री तो घरीच आला नाही. त्यामुळे तरुणाच्या भावाने त्याच्या कार्यालयात जाऊन पाहिले. त्या वेळी त्याने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे दिसून आले. मयूरच्या भावाने सिंहगड रस्ता पोलिसांना घटनेची माहिती आली. त्यानुसार सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. ही आत्महत्या नेमकी का केली हे समजू शकलेले नाही.
कागदावर सापडले हिशेब
मयूरजवळ ‘सुसाइड नोट’ सापडली नाही. मात्र, एका कागदावर त्याने काही हिशेब लिहून ठेवला आहे. त्यात कोणाकडून किती पैसे येणे आहे आणि कोणाला किती पैसे देणे आहेत, अशी माहिती लिहिली असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.