सध्या संपूर्ण देशात औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरु असलेला वाद संपायचे नाव घेत नाही. एकीकडे काही लोक कबर हटवण्याची मागणी करत आहेत. दुसरीकडे, अनेक नेत्यांनी आणि अगदी संघानेही याला वायफळ मुद्दा असे म्हटले आहे. या सगळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये ठिकठिकाणी पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टरवर ‘औरंगजेब इथेच गाडला…’ असे लिहिण्यात आले आहे. या पोस्टरची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.
मनसेने लावलेल्या पोस्टरमध्ये औरंगजेबाची कबर आणि तिथे जाण्याच्या मार्गाची माहिती देण्यात आली आहे. या पोस्टर्सनंतर राज्यात पुन्हा एकदा औरंगजेबबाबत चर्चा सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात सांगितले की, आम्हा मराठ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी आलेल्या औरंगजेबला येथे गाडण्यात आले. हा इतिहास प्रत्येकाला कळला पाहिजे, आपल्या पुढच्या पिढीतील प्रत्येक तरुणाला, प्रत्येक शाळकरी मुलाला हे माहित असले पाहिजे.
काय आहेत पोस्टर?
राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मनसेने छत्रपती संभाजीनगर शहरात औरंगजेबाची कबर किती किलोमीटर अंतरावर आहे याबाबतचे बॅनर लावले आहे. क्रांती चौकापासून 27 किमी, जिल्हा न्यायालयापासून 26 किमी, बाबा पेट्रोल पंप 25 किमी, होली क्रॉस शाळा 24 किमी, नगर नाका 23 किमी, पडेगाव 21 किमी, शरणपूर 14 किमी. आपल्यावर हल्ला करणारा शत्रू कुठे गाडला आहे हे सर्वांना कळावे म्हणून असे किलोमीटरचे बॅनर मनसेने लावले आहेत. एका बॅनरवर ‘आपल्या मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथेच गाडला गेला- राज ठाकरे… कबर.. खुलताबाद २७ किलोमीटर’ असे लिहिण्यात आले आहे.
मनसेने केले होते निवेदन जारी
एक दिवसापूर्वी मनसेने कबरीच्या देखभालीवर सरकारी पैसा खर्च करू नये, अशी मागणी केली होती. जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना कबरीच्या ठिकाणी अभ्यास दौऱ्यावर पाठवण्यात यावे, जेणेकरुन त्यांना वादग्रस्त मध्ययुगीन मुघल सम्राटाशी निगडीत इतिहास जाणून घेता येईल असे देखील म्हटले.