मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक वर्षा या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदार उपस्थित होते. यावेळी शहाजीबापू पाटील, संजय गायकवाड आणि राजेंद्र यड्रावकर हे तीन आमदार उपस्थित नव्हते. मात्र त्यांनी अनुपस्थित राहण्याबाबतची पूर्वकल्पना पक्ष नेतृत्वाला दिलेली होती. या बैठकीत प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यश अपयशाचा ऊहापोह करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची रणनीती ठरवण्याबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आल्याचे समजते.यावेळी लोकसभेच्या जागांवर उमेदवारी देताना असलेली परिस्थिती आणि नंतर निकालानंतर पुढे आलेली परिस्थिती यातील नेमक्या बदलाबाबत चर्चा झाली. ठाकरे यांच्या पाठीमागे निष्ठावान सैनिकांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात तसे घडलेले नाही. अनेक निष्ठावान सैनिकांचा आपल्या उमेदवारांना पाठिंबा मिळाला. मुंबईतील तीन जागा जरी ठाकरे गटाने जिंकल्या असल्या तरी त्यांना मिळालेली मतांची आघाडी खूप जास्त नाही. यावरून आपल्या पक्षाच्या उमेदवारांनाही मराठी मतदारांचा, मुळ निष्ठावान सैनिकांचा तेवढाच किंबहूना जास्त पाठिंबा असल्याचे दिसून येते असे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. ठाकरे गटाच्या उमेदवारांना जिंकून आणणारी मते ही एका विशिष्ट गटाची, प्रामुख्याने मुस्लिमांची मते मिळाल्याचेही या निवडणुकीत दिसून आले आहे. त्यामुळे यावर तसेच राज्यातील इतर परिस्थितीचा अभ्यास करून त्यावर आगागी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने काम करण्याच्या सूचना यावेळी शिंदे यांनी दिल्या.
दरम्यान, ज्या ठिकाणी उमेदवार पडले, त्या ठिकाणी महायुतीतील कोणत्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कशाप्रकारे काम केले याचाही आढावा घेण्यात आला. याबाबत आता तक्रार करण्यापेक्षा त्यात सकारात्मक पद्धतीने कशाप्रकारे बदल करता येईल, अधिक चांगले काम कसे करता येईल याच्याही सूचना शिंदे यांनी आमदारांना दिल्या. जागा वाटपात कशा जागा घ्यायच्या, आपल्या पक्षातील सर्व आमदारांचे मतदारसंघ कसे शाबूत ठेवायचे त्याचा निर्णय मी भाजपच्या नेतृत्वासोबत चर्चा करून घेईन, आता आपल्याकडे असलेल्या ४० आमदारांची संख्या कशी दुप्पट करता येईल याचीही रणनिती मी ठरवेन, मात्र तुम्ही याचा विचार न करता जोरदार कामाला लागा असे आदेशही शिंदे यांनी यावेळी दिल्याचे समजते.