स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका गाण्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. या गाण्याच्या माध्यमातून त्याने नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती, त्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली. दरम्यान त्यानंतर आता शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी देखील एक गाणं म्हणत कुणाल कामराला प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले शहाजी बापू?
‘मातोश्री के अंगण मे कामरा आया सुपारी लेके गाना गाया, उद्धवजी को खुशी आया लेकीन ठाणे का टायगर आखो मे अंगार उबाठा को खत्म करणे महाराष्ट्र के मैदान में आया,’ असं गाणं यावेळी शहाजी बापू यांनी म्हटलं आहे. दरम्यान कुणाल कामराच्या या विडंबनात्मक गाण्यामुळे राज्यातील 14 कोटी जनतेचं मन दुखावले आहे, त्यामुळे आपन सांगोला येथे कुणाल कामराच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.
पुढे बोलताना ते म्हणाले की, महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी, असा कायदा पारित व्हावा यासाठी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दरबारी आपले वजन वापरून निधी मिळवून शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं, निवडणूक काळात शेतकऱ्यांना दिलेलं कर्जमाफीचं वचन पूर्ण करावं, आपली फसवणूक झाली अशी भावना शेतकऱ्यांची होऊ नये, अशी मागणीही यावेळी शहाजी बापू यांनी केली आहे.
यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. अर्थमंत्री अजित पवार हे कधीही खोटं बोलत नाहीत, त्यामुळे त्यांनी तिजोरीची वास्तवता सांगितली आहे तरीही त्यांनी लाडकी बहीण योजना सुरूच ठेवावी. त्याचबरोबर केंद्रातून निधी आणून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणाही लवकरात लवकर करावी अशी मागणी शहाजी बापू पाटील यांनी यावेळी केली आहे.