मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल कोल्हे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते ४७ वर्षांचे होते. सध्या सुरू असलेल्या टी ट्वेन्टी विश्वचषक क्रिकेट करंडकाचे सामने पाहण्यासाठी ते अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात मित्रांसमवेत गेले होते. रविवारी पार पडलेल्या भारत-पाकिस्तान सामन्याचा त्यांनी आनंद घेतला. त्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागले. काही क्षणांत त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे.
अमोल काळे हे मूळ नागपूरचे आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय निकवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. दोन वर्षापूर्वी पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या मुंबई क्रिकेट असोसिशनच्या निवडणुकीत त्यांनी माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा पराभव करून अध्यक्षपद मिळविले होते.
एमसीएच्या कारभाराचे नेतृत्व करण्याबरोबरच, काळे हे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगसोबत या वर्षाच्या सुरुवातीला सुरू झालेल्या टेनिस-बॉल फ्रँचायझी क्रिकेट लीगचे सह-प्रवर्तक देखील होते.