पुणे रेल्वे स्टेशन हे दक्षिण व उत्तरेत जाणाऱ्या रेल्वेसाठीचे एक मुख्य स्टेशन आहे. या ठिकाणाहून दीडशेपेक्षा जास्त रेल्वे गाड्या धावतात. त्यामुळे या ठिकाणी काम करणे खूपच अवघड आहे. पुणे शहराचा विस्तार पाहता या ठिकाणी आणखी काही फलाटांची आवश्यकता आहे. त्यामुळे रिमॉडलिंग करताना सर्व गोष्टींचा विचार करून एकदाच काम करावे लागणार आहे. त्या दृष्टीने पुणे रेल्वे स्टेशन येथे नव्याने चार फलाट उभारण्याचे नियोजन रेल्वे विभागाकडून करण्यात येत आहे. रिमॉडलिंगच्या आराखड्यात या नवीन चार फलाटांचा समावेश करून कामे केली, तर पुढील काही वर्षे पुणे रेल्वे स्टेशनवरील ताण कमी होईल. या दृष्टीने पुणे रेल्वे विभागाने पुणे स्टेशन येथे नवीन चार फलाट उभारण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे.
मालधक्क्याच्या बाजूला चार फलाट
पुणे रेल्वे स्टेशन येथे सध्या सहा फलाट आहेत. त्या ठिकाणी फलाट वाढविण्यासाठी जागा नाही; परंतु मुंबईच्या दिशने मालधक्का येथे रेल्वेची मोठ्या प्रमाणात जागा आहे. त्या ठिकाणी चार फलाट उभारणे शक्य आहे. त्यानुसार नवीन चार फलाट उभारण्याचे नियोजन पुणे रेल्वे विभागाने केले आहेत. पादचारी पुलांच्या माध्यमातून जुने व नवीन फलाट जोडणे सहज शक्य आहे. तसेच, जुन्या सहा फलाटचा विस्तार केल्यानंतर तेथूनही २४ डब्यांच्या रेल्वे धावू शकतील.
पुणे रेल्वे स्टेशन येथे नवीन चार फलाट उभारण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मालधक्काच्या बाजूने असलेल्या जागेत हे नवीन फलाट उभाण्याचे नियोजन आहे.
– इंदू दुबे,
डीआरएम, पुणे रेल्वे विभाग