विधानसभेच्या अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट उत्तर दिलं. राज्यात कुठलीही घटना झाली की काही लोक माझा सगेसोयरा करून टाकतात. झालेला प्रत्येक प्रसंग पाहा, गृह विभागाने कडक कारवाई केली आहे. माझा सगेसोयरा असेल तर कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा फडणवीसाांनी देत विरोधकांना थेट प्रत्युत्तर दिलं.
अंतिम आठवडाचा टेक्स्ट तीन पानांचा आहे, इतके वर्ष आपण सभागृहात आहोत. इतका मोठा टेक्स्ट कधीच नव्हता. त्यातील अर्ध्या विषयावर कोणीच बोललं नाही. टेक्स्ट तयार करणारे आणि मांडणारे यांच्यात काही बोलणं झालं का? मी गृहविभागाच्या सर्व विषयांवर उत्तर दिलं होतं. तरीही प्रश्न आले. काही अडचण नाही. पण नव्याने काहीच मांडणी नाही. तिच मांडणी झाली.
सुनील प्रभूंनी जी आकडेवारी मांडली, तीच आकडेवारी नाना पटोलेंनी मांडली. मूळातच मला असं वाटतं की, विरोधी पक्षाला आपल्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत जावं लागेल. आपल्याला अंतिम आठवडा प्रस्ताव संधी असते, ज्या विषयांवर चर्चा होऊ शकली नाही, त्यातील महत्त्वाचे विषय अंतिम आठवडा प्रस्तावात आणता येऊ शकतात. पण दुर्देवाने तसं होऊ शकलं नाही. मी व्हॉलिंटियर करायला तयार आहे. विरोधी पक्षाला विरोधी पक्षात कसं काम करायचं याचं प्रशिक्षण हवं असेल तर मी पक्षाचा अभिनिवेश विसरून हे प्रशिक्षण द्यायला तयार आहे. गरज पडली तर भुजबळ आणि मुनगंटीवार यांचीही मदत घेईन असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला.
भुजबळ साहेब एकटेच होते पण…
शेवटी सक्षम विरोधी पक्ष असणं लोकशाहीत महत्त्वाचं आहे. सक्षमता ही संख्येने ठरत नाही. भुजबळ साहेब एकटेच होते. संपूर्ण सभागृह डोक्यावर घ्यायचे. पण विषय योग्यच घ्यायचे. म्हणून मला वाटतं भास्करराव, तुमच्यासारखा ज्येष्ठ सदस्य असताना अंतिम आठवडा प्रस्तावावर अन्याय झाल्याचा दिसतो.
माझा सगेसोयरा असेल तरी कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाही
गृहमंत्री असलो की प्रत्येक गोष्टीचा थेट संबंध माझ्याशी जोडला जातो. 2022 ते 24 तुम्ही मला टार्गेट केलं. पण परिणाम काय झाला, लोकांनी आधीपेक्षा रेकॉर्ड मँडेट आम्हाला दिलं. कुठलीही घटना झाली की काही लोक माझा सगेसोयरा करून टाकतात. झालेला प्रत्येक प्रसंग पाहा, गृह विभागाने कडक कारवाई केली आहे. माझा सगेसोयरा असेल तर कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा फडणवीसाांनी दिला. माझा सगा भारताचं संविधान आणि माझे सोयरे हे 13 कोटी महाराष्ट्राची जनता आहे. याच्यापलीकडे दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला झुकतं माप मिळणार नाही, असे फडणवीसांनी बजावून सांगितलं.
नाना भाऊ रोज वाक्य वापरतात की कुंपणच शेत खात आहे. पण आमचं शेत मुक्त आहे, कुंपणच नाहीये. कोरटकरवरून एवढा गदारोळ सुरू आहे, त्याला पकडला ना. कुठे लपून बसला होता, तेलंगणा मध्ये कुणाच्या घरी ते सगळ्यांना माहीत आहे, कुणी आश्रय दिला तेही माहीत आहे. आता त्यावरून राजकारण करायचं नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांवरून कोणी बोलत असेल तर योग्य ती कारवाई करूच. ते आपलं दैवत आहे, दैवताचा अपमान सहन करणार नाही, असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
कितीही काड्या घाला तरीही..
तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी आम्ही तिघं एकमेकांच्या पायात पाय घालणारे नाही, एकमेकांच्या हातात हात घालून राज्यकारभार आम्ही चालवणार आहोत. अजित दादा एकदम दरडावून बोलतात,त्यामुळे त्यांच्या वाटेला फारसं कोणी जात नाही . आम्ही दोघं आपले ( फडणवीस आणि शिंदे) मवाळ, सगळ्यांना घेऊन आम्ही चालत असतो, त्यामुळे तुम्ही कितीही काड्या घालण्याचा प्रयत्न केलात किंवा बांबूची लागवड केली तरीही.. यश मिळणार नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.