शिंदेसेनेपेक्षा कमी खासदार, तरीही मारली बाजी; मोदींच्या हनुमानाची वरचढ कामगिरी, ताकद दाखवली

मुंबई: मोदी सरकारच्या तिसऱ्या मंत्रिमंडळातील ७१ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा काल दिल्लीत संपन्न झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींसह एनडीएमधील विविध पक्षांच्या ७१ जणांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यामध्ये भाजपचे सर्वाधिक मंत्री आहेत. किंगमेकर ठरलेला चंद्राबाबू नायडूंचा तेलुगू देसम पक्ष आणि नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड यांना प्रत्येकी दोन मंत्रिपदं मिळाली आहेत. महाराष्ट्रातून एकूण ६ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. सात खासदार असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला केवळ एक मंत्रिपद मिळालं आहे. विशेष म्हणजे तेही राज्यमंत्रिपद (स्वतंत्र कार्यभार) आहे.

भाजपसोबत जागावाटपात शिंदेंना बरीच ओढाताण सहन करावी लागली. त्यांनी वाटाघाटीत १५ जागा मिळवल्या. त्यातील ७ जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले. विशेष म्हणजे त्यांची कामगिरी भाजपपेक्षा चांगली झाली. भाजपनं २८ जागा लढवल्या. पण त्यांना केवळ ९ जागांवर यश मिळालं. ७ जागा जिंकणारे शिंदे मुत्सद्देगिरीत कमी पडले. जागावाटप, निवडणूक व्यवस्थापनात सरस कामगिरी करणाऱ्या शिंदेंना मंत्रिमंडळात अधिक बळकट स्थान मिळू शकलं असतं. पण मुत्सद्देगिरीत ते मागे पडल्याचं चित्र आहे.
मोदी कॅबिनेटमध्ये राष्ट्रवादी नाही; मंत्रिपद न मिळाल्यानं खदखद, NCPमध्ये ऑल इज नॉट वेल?
लोकसभेत ७ खासदार असलेल्या शिंदेसेनेला केवळ १ मंत्रिपद देण्यात आलं आहे. तेही राज्यमंत्रिपद (स्वतंत्र कार्यभार) आहे. तर बिहारमध्ये लोकजनशक्ती पक्षाच्या चिराग पासवान यांनी ५ खासदारांच्या जोरावर कॅबिनेट मंत्रिपद पदरात पाडून घेतलं आहे. आपण मोदींचे हनुमान असल्याचं पासवान सांगतात. या हनुमानाला आता मोदी मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे. रिपाईंच्या रामदास आठवलेंचा लोकसभेत एकही खासदार नसताना, ते स्वत: भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर असताना राज्यमंत्रिपद मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत.

शिंदेसेनेपेक्षा कमी खासदार असूनही लोकजनशक्ती पक्ष आणि जनता दल सेक्युलरनं मुत्सद्देगिरी दाखवली. जेडीएसचे केवळ २ खासदार आहेत. मात्र तरीही त्यांनी केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळवलं आहे. पण ७ खासदार असूनही एकनाथ शिंदेंना ही किमया साधता आलेली नाही. शिंदेसेनेचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. ते सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत.