सेनाभवनासमोर ‘मोदी ओरिजिनल ब्रँड’चे बॅनर, भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले

मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय तापमान अधिकच वाढले आहे. त्यात रविवारी शिवाजी पार्क येथील एका बॅनरने आणखी भर टाकली. थेट शिवसेना भवनाच्या समोर लावण्यात आलेल्या या बॅनरमध्ये ‘मोदी ओरिजनल ब्रँड’ असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या बॅनरच्या माध्यमातून मुंबई भाजपने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला असून हे बॅनर रविवारी दिवसभर चर्चेचा विषय ठरले.
नितीन गडकरींनी घेतली मंत्रिपदाची शपथ, रस्ते आणि उड्डाणपुलांचे असे जाळे घातले, ‘गडकरी’ चे केले ‘रोडकरी’
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी ‘सामना’ या मुखपत्रातून भाजपवर निशाणा साधला. बहुमत नसतानाही मोदी हे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या कुबड्या घेऊन सरकार बनवत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.‘२०१४ आणि २०१९ प्रमाणे मोदी यांना सरकार स्थापनेसाठी साधे बहुमत मिळवता आले नाही. देशाच्या जनतेने सत्तेतील फॅसिस्ट प्रवृत्तींचा पराभव केला. भाजपला बहुमताच्या आकड्यापासून दूर ठेवले. नरेंद्र मोदींचा हा पराभव आहे. तरीही मोदी यांनी आता ‘एनडीए’चे सरकार म्हणून तिसऱ्यांदा शपथ घ्यायचे ठरवले. लोकसभा निकालाने मोदी व त्यांच्या लोकांचे पाय जमिनीवर येतील, असे वाटले होते, पण बहुमत नसतानाही मोदी नितीश कुमार, चंद्राबाबू, चिराग पासवान यांच्या कुबड्या घेऊन सरकार बनवत आहेत,’ अशी टोलेबाजी संजय राऊत यांनी केली.

दुसरीकडे भाजपने मुंबईत नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचे तसेच भाजपच्या विजयाचे बॅनर झळकवले. यात थेट शिवसेना भवनसमोरही बॅनरबाजी करण्यात आली. ‘मोदी ओरिजनल ब्रँड’ अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आले. ‘ब्रँड मोदी’ अधोरेखित करत ठाकरे यांच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न भाजपने केला. एकमेकांना शह-काटशह देण्याचा ठाकरे यांची शिवसेना आणि भाजपमधील हा सिलसिला येत्या काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.