मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी मांडली. इतर राज्यातील आकडेवारीची तुलना केल्यास गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात आठवा तर शहरांमध्ये नागपूरचा सातवा क्रमांक लागतो असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे. दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्यप्रदेश, ओडिशा, आंध्रप्रदेश देशातील ही प्रमुख राज्य आपल्या पुढे असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
ही गोष्ट खरी आहे की देशामध्ये महाराष्ट्र एक अतिशय महत्त्वाचं राज्य आहे. देशामध्ये जर आपण तुलना केली तर आपला क्रमांक गुन्हेगारीमध्ये आठवा आहे. दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्यप्रदेश, ओडिशा, आंध्रप्रदेश ही जी काही महत्त्वाची राज्य आहेत ती क्राइम रेटमध्ये आपल्या पुढे आहेत. आणि आपण जर शहरांचा विचार केला तर पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्रातील एकही शहर नाही. पहिल्या दहामध्ये सातव्या क्रमाकांवर आपल्याला नागपूर दिसतं. पण ते यासाठी दिसतं की नागपूरमध्ये आपण नागपूर ग्रामीणचा जवळपास 25 टक्के भाग हा सामील केला, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, एनसीआरबीच्या डेटामध्ये ते सध्याची लोकसंख्या पकडत नाही. त्यांचं म्हणणं असतं की, आम्ही फक्त जनगनणेचीच लोकसंख्या पकडून, त्यामुळे गुन्ह्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं. मात्र लोकसंख्या 2011 चीच आहे. जर आपण आताची लोकसंख्या पकडली तर नागपूर हे 22 व्या 23 व्या क्रमांकावर जातं. त्यामुळे विचार केला तर पहिल्या दहामध्ये आपलं कोणतंही शहर नाही, मुंबई सारखं शहर हे पंधराव्या क्रमांकावर आहे, पुणे 18 व्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर दिल्ली आहे, दुसऱ्या क्रमांकावर जयपूर आहे. तिसऱ्या क्रमाकांवर इंदोर आहे. चौथ्या क्रमांकावर कोची आहे. पाचव्या क्रमकांवर पटणा आहे. गाझियाबाद, कोझीकोड आहे.
त्यामुळे तुलनेनं महाराष्ट्रात जी शहरं आहेत, शहरीकरण आणि विकास इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर देखील इथे कायदा आणि सुवव्यस्था आपल्याला पाहायला मिळते. हे होत असताना आपण जर पाहिलं तर एकूण गुन्ह्याची संख्या आपण पाहिली तर आकडेवारी ही महत्त्वाची नसतेच, आकडेवारी ही मिसलिडींग असते. वस्तुस्थिती काय आहे हे महत्त्वाचं असतं तरी देखील काही गोष्टी या आकडेवारीतूनच सांगाव्या लागतात. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये गुन्ह्यांच्या संख्येत 2 हजार 586 ने घट झाल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.